जळगाव प्रतिनिधी ─ शहरातील तेली चौक परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाने दीर्घकाळापासून त्रस्त करणाऱ्या आजाराला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना रविवारी (३० नोव्हेंबर) सायंकाळी घडली. अशोक कडू चौधरी (वय ६५, रा. तेली चौक, जळगाव) असे मृताचे नाव असून, शनीपेठ पोलीस ठाण्यात रात्री नऊच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. आजारामुळे वाढलेला मानसिक तणाव व चिंता यामुळे ते काही दिवसांपासून नैराश्येत असल्याचे समोर आले आहे. रविवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना त्यांनी राहत्या घरातील फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना त्वरित खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शनीपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ भागवत शिंदे करत आहेत.

