सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुका होताच सोयगाव तालुक्यातून अनेक कुटुंब इतर जिल्ह्यात व राज्याच्या बाहेर ऊसतोडीसाठी रवाना झाले आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील वाड्या वस्त्या तांडे ओस पडलेली आहे. दरम्यान इतर जिल्ह्यात बऱ्याच साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. त्यामुळे सोयगाव तालुक्यातून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आपल्या मुलाबाळांसह तालुक्यात दाखल झाल्या आहेत. तालुक्यात विविध ठिकाणच्या ऊस तोड मजुरांच्या स्थलांतर झाले आहेत. ऊसतोड सुरू असताना लहान लहान मुले आपल्या पालकांना कारखान्यावर ऊसतोडीसाठी मदत करत आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांची मुलेही शिक्षणापासून दूर फेकली जात आहेत. ज्या मुलांच्या हाती पाटी, पेन, पेन्सिल, पुस्तक हवे त्याच्या हाती कोयता, दोरी दिसत आहे. ही मुले शाळेऐवजी उसाच्या फडात राबत आहेत.
सोयगाव परिसरातील रामपूर वाडी, निंबायती, उमर विहिरे, कवली, बनोटी तांडा, हनुमंत खेडा, नायगाव,जरंडी, रामपुरा तांडा, उपलखेडा यासह अनेक गावातून बीड, धाराशिव, अहिल्याबाई होळकर नगर, लातूर आदी ठिकाणी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाले आहेत. ते साधारण सात ते आठ महिने या कामात आपल्या मुलाबाळांसह व्यस्त असतात. त्यामुळे ती मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. उसावर चालणाऱ्या सपासप कोयत्याप्रमाणे मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर वार होत आहे मुलांनी शिकून मोठे व्हावे, नोकरी करावी असे मजुरांना वाटते.
पण मोठ्या आर्थिक टंचाईमुळे त्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळेच त्यांना नाइलाजाने मुलांना आपल्या सोबत ऊसतोड कामगार घेऊन गेले आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. दरम्यान या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक कारखान्यावर साखर शाळेची सोय करण्यात आली होती. परंतु मजुरांमधील प्रबोधन अभावी त्या शाळेत गळतीचे प्रमाणही वाढले आहे. तर काही ठिकाणी या शाळाच गायब झाल्या आहेत.