माझे प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिले पाहिजे !

सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानामुळे खळबळ

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मंत्रिपद न मिळालेले सुधीर मुनगंटीवार संधी मिळेल तेव्हा एकतर खदखद व्यक्त करतात किंवा टोमणा तरी मारतात. त्याचा प्रत्यय नाशिकमधल्या व्याख्यानमालेतही आला. व्याख्यानमालेत येणाऱ्याचे प्रमोशन होते असा संवाद आयोजक आणि मुनगंटीवारांमध्ये झाला होता. त्याला संदर्भ होता गेल्या व्याख्यानमालेतल्या फडणवीसांच्या उपस्थितीचा. त्या संवादावर बोट ठेवताना सुधीर मुनगंटीवारांनी केलेले वक्तव्य भाजप श्रेष्ठींना कितपत पटेल कुणास ठाऊक. कारण प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकले पाहिजे असे वक्तव्य मुनगंटीवारांनी केले आहे.

या व्याख्यानमालेत काँग्रेसचे प्रणिती शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत देखील मार्गदर्शन करणार आहेत. या दोघांचे प्रमोशन होण्यासाठी सरकारमध्ये बदल होणे गरजेचे आहे याची देखील मुनगंटीवारांनी आठवण करून दिली. आता मुनगंटीवारांच्या मुखी सरकार बदलाची भाषा येऊ लागल्याने चर्चांना उधाण आले.

नाशिकमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्याच्या निमित्ताने विचारवंतांचे जाहीर व्याख्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जो या कार्यक्रमाला येतो त्यांचा प्रमोशन होतो असे आयोजकांनी सांगितले. पण माझे प्रमोशन होण्यासाठी माझे सरकार राहिले पहिजे. उद्या आणि परवा येणारे वक्ते यांची नावे पाहिली तर त्यांचे देखील प्रमोशन होणार का? उद्या प्रणिती शिंदे आणि पर्वा अरविंद सावंत येणार आहेत. माझे प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावे लागणार. पहिल्यांदा आमदार झाल्यावर टॅक्सीमधून विधानभवनात जात होतो. त्यावेळी ड्रायवर म्हणाला की विधानभवनाला बॉम्बने उडवले तर राज्यातील सगळे आनंदी होतील. त्या ड्रायव्हरला माहिती नव्हते की मी आमदार आहे. ज्या लोकशाही भवनात मी पहिल्यांदा निवडून गेलो त्या भवनावर लोकांचे किती राग आहे हे मला कळले. लोकसभेत मी पहिल्यांदा लढलो तेव्हा देखील हरलो होतो आणि आता देखील हरलो. त्यामुळे बहुतेक माझ्या नशिबात लोकसभा नसेल असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.