जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या एका 46 वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. 27 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजता घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी घरच्यांना मोबाईलवर सुसाईड नोट लिहून 9 जणांवर गंभीर आरोप करत पैशांची मागणी केल्याचे नमूद केले आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यावेळी आई-वडील भाऊ बहिणींनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. अनिल हरी बडगुजर (वय 46, रा.जीवन नगर ह.मु. वाघ नगर) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहिती अशी की, शहरातील जीवन नगरातील रहिवाशी असलेला अनिल बडगुजर हे वाघ नगर येथे एकटेच वास्तव्याला होते. जिल्हा परिषदेतील डीआरडीओ विभागातील बचतगट विभागात कंत्राटी पध्दतीने ते मॅनेजर म्हणून काम करत होते. सोमवार दि. 27 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजता त्यांनी वाघ नगर येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून आई-वडील व भाऊ यांच्या मोबाईलवर पाठविली होती. सुसाईड नोट वाचून अनिलचे वडील हरी बडगुजर आणि भाऊ अमित बडगुजर हे दोघी तातडीने वाघ नगर येथील राहत्या घरी धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता.
सुसार्इड नोटमध्ये व्हाटसॲपवर मजकूरात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. हरेश्वर भोई, राजू लोखंडे, कोमल जावळे, सुरेखा पाटील, रुपाली पाटील, सीमा पाटील, साधना देशमुख, शरद पाटील, संदीप खेडकर यांना दोषी ठरवण्यात यावे व जो पर्यंत त्यांना अटक होत नाही तो पर्यंत माझ्या देहास अग्नी डाग देण्यात येऊ नये ही माझी शेवटची ईच्छा आहे असे नमूद केले आहे.
दरम्यान या संदर्भात मयताचे आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणींनी सांगितले की, अनिल याला गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या विभागातील बचत गटातील महिला व कर्मचारी हे विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. या तसेच स्थानिक समितीमध्ये अनिलच्या विरोधात तक्रारही केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी महिला कर्मचारी यांनी 6 लाखांची मागणी केली. सुरूवातीला 6 लाख रूपये दिले परंतु त्यानंतर तक्रार मागे न घेता पुन्हा 6 लाखांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे, असा आरोप आई लिला बडगुजर आणि बहिण स्वाती पचलोड यांनी केला आहे. दोषींना अटक करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.