धानोरा, ता. चोपडा
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कोणतीही खडतर परीक्षा जिंकता येते, याचे उत्तम उदाहरण धानोरा येथील रुत्विक वैशाली जयप्रकाश महाजन याने घालून दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2025च्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत रुत्विकने घवघवीत यश संपादन करत महाराष्ट्र राज्यात ओपन प्रवर्गातून आठवा क्रमांक पटकावला. तसेच ओबीसी प्रवर्गात तिसरा, तर पेपरमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याने आपल्या कुटुंबासह गावाचे आणि संपूर्ण परिसराचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी रुत्विकचे कौतुक करत, परिश्रमानेच यशाची प्राप्ती होते. रुत्विकचे यश हे जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केले.
रुत्विक महाजन याच्या एमपीएससी परीक्षेतील यशाबद्दल येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात स्वामी जनार्दन हरीजी महाराज बोलत होते. यावेळी सतपंथ ज्योत मंदिराचे गादीपती संतश्री विजयप्रकाशजी महाराज यांनीही रुत्विकला आशीर्वाद दिला. रुत्विकच्या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी रुत्विकचे औक्षण करून नागरिकांनी त्याचा सत्कार केला. एमपीएससी परीक्षेत रुत्विकने मिळविलेल्या तीन मानांकनांची विशेष चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य ओपन रँकमध्ये आठवा, ओबीसी प्रवर्गात तिसरा आणि पेपर रँकमध्ये प्रथम क्रमांक मिळवत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, देशसेवेच्या भावनेने भावी वाटचाल करण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत.
याप्रसंगी रुत्विकचे काका प्रवीण महाजन, अनिल महाजन, साहेबराव पाटील, मालनबाई पाटील, उमेश पाटील, दूध डेअरीचे माजी चेअरमन मुकेश पाटील, विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, पर्यवेक्षक एल. डी. पाटील, विलास पाटील, माणिकचंद महाजन, राजेश महाजन, सुरेंद्र महाजन, एस. पी. महाजन, रवींद्र महाजन, गजानन चौधरी, वासुदेव महाजन, अशोक पाटील, वसंत पाटील, अतुल पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

