लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची कडक अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार असल्याची माहिती परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान नाही, त्यांच्यावर कायद्याच्या कक्षेत राहून कठोर कारवाई केली जाणार आहे. या संदर्भातील सर्व स्पष्ट सूचना आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे.
मराठी शिकण्याची मुदत संपली आहे. आता उद्यापासून कारवाई केली जाणार आहे. मराठी येत नसेल तर आरटीओ प्रशासनाकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना याबाबत रीतसर नोटीस बजावली जाणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर संबंधित चालकाला मराठी भाषा शिकण्यासाठी १ महिन्याची (३० दिवस) मुदत दिली जाईल. ३० दिवसांनंतरही चालकाला मराठीचे व्यावहारिक ज्ञान आले नाही किंवा तो मराठी बोलू शकला नाही, तर त्याचा बॅच ३ महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. ३ महिन्यांच्या निलंबनाच्या कालावधीतही जर चालकाने मराठी भाषा शिकली नाही, तर त्याचा बॅच आणि परवाना कायमचा बंद (रद्द) केला जाईल, असा इशारा सरनाईकांनी दिला आहे.
आतापर्यंत सुमारे ९ लाखांच्या आसपास लायसन्स आणि बॅच वाटप करण्यात आले आहेत. परवाना देतानाच आधी जर आरटीओ अधिकाऱ्यांनी मराठीच्या ज्ञानाची तपासणी केली असती, तर आज ही वेळ आली नसती, असे मत सरनाईनाईकांनी व्यक्त केले. त्यामुळे आता यापुढे नवीन बॅच किंवा लायसन्स देताना आरटीओ अधिकाऱ्यांना काही आदेश देण्यात आल्याचे सरनाईकांनी सांगितले.
रिक्षा, टॅक्सी चालवण्याचा परवाना देण्यापूर्वी चालकाच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची कसून तपासणी केली जाईल आणि या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाईल. चालकाचे डोमेसाईल (अधिवास दाखला) प्रमाणपत्रही कडकडीत तपासण्याचे आदेश देण्यात आल्याचे सरनाईकांनी सांगितले. मराठी भाषेचा सन्मान आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून याची राज्यभरात कडक अंमलबजावणी पाहायला मिळेल, असे परिवाहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.


