लोकशाही न्यूज नेटवर्क

कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरातील संदीप हाॅटेल भागात रविवारी दुपारपासून एका पिसाळलेल्या भटक्या श्वानाने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. केवळ सात ते आठ तासांच्या कालावधीत या एकाच श्वानाने रस्त्यावरील पादचारी, नागरिक, दुचाकी आणि रिक्षाचालकांवर अचानक हल्ले करत तब्बल १३० हून अधिक जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंतच्या काळात या पिसाळलेल्या श्वानाने संदीप हाॅटेल परिसर, बिर्ला महाविद्यालय रस्ता, जुने आरटीओ कार्यालय आणि भोईरवाडी परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. हा श्वान पाठीमागून येऊन नागरिकांना अचानक चावत होता. रस्त्यावरून चालणारे पादचारी, दुचाकीस्वार तसेच रिक्षांमागे धावून प्रवाशांवर हल्ले केल्यामुळे नागरिकांमध्ये एकच पळापळ उडाली.
अचानक झालेल्या या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने पालिकेच्या कल्याणमधील शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत सुमारे ११० ते १३० श्वान दंशाची नोंद रुग्णालयांमध्ये झाली असून, त्यापैकी २५ गंभीर रुग्णांवर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका ११ वर्षांच्या मुलीवर या श्वानाने अत्यंत आक्रमकपणे हल्ला केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या जखमेची तीव्रता पाहता तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात तातडीने पाठवण्यात आले आहे. इतर काही किरकोळ जखमी रुग्णांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे, तर काहींना सोमवारी पुन्हा उपचारासाठी बोलावण्यात आले आहे.
रविवारची सुट्टी असल्याने अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले होते. मात्र, या भटक्या श्वानाच्या प्रचंड दहशतीमुळे नागरिकांनी स्वतःला घरांमध्येच कोंडून घेतले. पालकांनी आपल्या मुलांना सोसायट्यांच्या आवारात किंवा मैदानांवर खेळण्यासाठी सोडणे पूर्णपणे टाळले. या संकटाच्या काळात नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु रविवारची सुट्टी असल्याने पालिकेकडून कोणताही तत्पर प्रतिसाद मिळाला नाही, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
एकाच श्वानाने शेकडो नागरिकांना चावा घेतला असतानाही स्थानिक प्रशासन आणि नगरसेवकांनी तातडीने दखल न घेतल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. स्थानिक रहिवासी राम तिवारी यांनी सांगितले की, पालिकेने याप्रकरणी वेळीच कडक आणि तत्पर कारवाई करणे आवश्यक होते, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.


