शेअर बाजाराचा बुल पुन्हा अग्रेसर!

सेन्सेक्सने तोडले सर्व रेकॉर्ड : निफ्टीनेही मारली जोरदार मुसंडी

0

 

मुंबई

 

शेअर बाजाराचा बुल पुन्हा एकदा तेजीच्या वाटेवर अग्रेसर झाला आहे. देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी परतली असून मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक एनएसई निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांकावर भरारी घेतली. एकीकडे ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने 78,000 अंकांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीने 23,700 अंकांची पातळी ओलांडली आहे.

 

 

बँकिंग क्षेत्रातील तेजीमुळे शेअर मार्केटमध्ये हिरवळ पसरली. निफ्टीमध्ये ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये लक्षणीय तेजी नोंदवली गेली. दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत असून आयटी स्टॉक्समध्येही तेजी नोंदवली गेली ज्यामध्ये लार्सन अँड टुर्ब्रो, टेक महिंद्रा आणि इन्फोसिस यांचा समावेश आहे.

 

 

सेन्सेक्स, निफ्टीचा ऐतिहासिक उच्चांक

देशांतर्गत शेअर मार्केटने पुन्हा एकदा ऐतिहासिक भरारी घेतली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स व्यवहाराच्या सत्रात 675 अंकांनी वधारला आणि 78,016.04 अंकांवर पोहोचला. मात्र, दुपारी अडीच वाजता सेन्सेक्स 620 अंकांच्या वाढीसह 77,960.95 अंकांवर व्यवहार करत असून मंगळवारी निर्देशांकाने 77,529.19 अंकांवर ओपनिंग केली. त्याचवेळी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा एनएसई निफ्टीनेही तेजीसह ट्रेडिंग सत्रात 23,710.45 अंकाचा सर्वकालीन उच्चांक नोंदवला तर, निफ्टीने दिवसभरात आतापर्यंत 172.6 अंकांपर्यंत वाढ नोंदवली आहे.

 

 

हे शेअर्स आले तेजी

बँकिंग स्टॉक्समधील तेजी देशांतर्गत बाजारातील तेजीचे मुख्य कारण मानले जात आहे. ॲक्सिस बँकेचा स्टॉक सुमारे 3 टक्के वाढीसह 1,263.5 रुपयांवर पोहोचला तर श्रीराम फायनान्समध्ये 2.70 टक्के, ICICI बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 2.25 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये दीड टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. दुसरीकडे, निफ्टीत बीपीसीएलचा शेअर 2.50 टक्क्यांची सर्वाधिक घसरण दाखवत आहे तर टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये दीड टयांची पडझड नोंदवली जात आहे. तसेच आयशर मोटर्सचे शेअर्स 1.40 टक्के घसरणीसह व्यवहार करत असताना ओएनजीसी आणि अदानी पोर्टचे शेअर्स 1 टक्के घसरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.