भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ विभागातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, खाजगी, अनुदानित, विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये विद्यार्थी आजारी पडल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी ‘सिक रूम’ (उपचार विभाग) स्थापन करणे अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भुसावळ शहरतर्फे केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने गटशिक्षण अधिकारी किशोर वायकोळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जिल्ह्यातील बदलत्या हवामानामुळे व उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे शाळांमध्ये ‘सिक रूम’ अनिवार्य करणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गटशिक्षण अधिकारी यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, भुसावळ तालुक्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना याबाबत तातडीने प्रसिध्दी पत्रक जारी केले आहे. यावेळी मनसे शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, शहर सचिव मंगेश भावे, शहर उपाध्यक्ष हरीश लोखंडे, सुजित शिंदे, मयूर भंगाळे उपस्थित होते.