आता एसटीचे लोकेशन आपल्या मोबाईलवर !
दसऱ्याला एसटी महामंडळाचे ‘आपली एसटी’ मोबाइल अँप लाँच

मुंबई, : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आपली एसटी’ हे नवीन मोबाइल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे प्रवाशांना एसटी बसचे नेमके स्थान आणि वेळेची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. राज्यातील १२ हजारांहून अधिक बस आणि १ लाखाहून अधिक मार्गांचे मॅपिंग करून हे अॅप विकसित करण्यात आले आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या अॅपला ‘आपली एसटी’ हे मराठमोळे नाव दिले आहे. यापूर्वी ‘कम्युटर अॅप’ म्हणून ओळखले जाणारे हे अॅप आता नव्या स्वरूपात आणि सुधारित वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. कोविडपूर्व काळापासूनच बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आणि ट्रॅकिंगसाठी अॅप विकसित करण्याचे नियोजन होते, जे आता प्रत्यक्षात उतरले आहे. अॅपमध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत:
जवळचा बसथांबा शोधण्याची सुविधा.
दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसचे वेळापत्रक आणि मार्गाची माहिती.आरक्षित तिकिटावरील बस क्रमांकाद्वारे बसचे थेट लोकेशन ट्रॅकिंग.सुरक्षेसाठी आपत्कालीन क्रमांक आणि एका क्लिकवर कॉल करण्याची सोय.
बस ट्रॅकिंग कसे होणार?
प्रवाशांना तिकिटावरील ट्रिप कोड अॅपमध्ये टाकून बसचे सध्याचे स्थान तपासता येईल. तसेच, त्याच मार्गावरील इतर बस, त्यांचे वेळापत्रक आणि थांब्यांची माहितीही उपलब्ध होईल. मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून या यंत्रणेवर देखरेख ठेवली जाणार आहे. सध्या १२ हजार बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून, उर्वरित बसमध्ये ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.


