एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ? 

पगार दिवाळीपूर्वीच मिळावा : महामंडळाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याचबरोबर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळावी, यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही महामंडळाने सरकारकडे केली आहे.

राज्यात सणासुदीच्या दिवसांत प्रवासासाठी एसटी बसचा सर्वाधिक वापर होतो. दिवाळी सणाच्या गर्दीच्या हंगामात प्रवासीसंख्या वाढत असल्याने महामंडळाला चांगला महसूलही मिळतो. त्यासाठी सणासुदीला सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड व्हावी, यासाठी महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 7 तारखेला होतो. यंदा सोमवारी, 28 ऑक्टोबरला वसूबारस ते रविवारी, 3 नोव्हेंबरला भाऊबीज यादरम्यान दिवाळी सण साजरा होणार आहे.

ऑक्टोबर महिन्याचा पगार 7 नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे. मात्र, दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याचा महामंडळाचा मानस आहे. यासाठी राज्य सरकारकडून लवकर निधी मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळीभेट देण्यात येते. यंदा ही भेट कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणीही महामंडळाने राज्य सरकारकडे केली आहे. यामुळे यंदा दिवाळीआधी पगार मिळणार की, दिवाळी सण उसनवारीने साजरा करावा लागणार, याकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

दिवाळी भेटीची आशा धूसर

एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट देण्यासाठी 55 कोटींचा निधी आवश्यक असतो. राज्य सरकारने निधीची कमतरता असल्याचे कारण देत महामंडळाची मागणी पूर्ण केली नाही. यामुळे यंदा एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळण्याची आशा धूसर आहे, असा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.