लोकशाही न्यूज नेटवर्क
आंतरराष्ट्रीय, नफा न कमावणारी, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था म्हणून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची ख्याती जगभरात आहे. त्यांनी 1981 मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना केली. तर दीर्घकालीन विकासाचे उपक्रम राबवणे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगबरोबर समन्वय साधून संघर्ष निवारण करण्यासाठी १९९७ सालापासून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज (IAHV) संस्थेच्या माध्यमातून अविरत सेवा कार्य सुरू केले आहे. कोविड 19 या जागतिक महामारीनंतर श्री श्री रविशंकर यांनी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. युद्धग्रस्त युक्रेनच्या निर्वासितांचे पुनर्वसन असो, कोलंबियातल्या अंतर्गत यादवीत होरपळलेल्या पीडितांना सांत्वना देणे असो, किंवा भारतातील नक्षलग्रस्त आणि अतिरेकी हल्ले झालेल्या भागात शांतता प्रस्थापित करणे असो, अशा आपसात दरी वाढलेल्या काळात तिथे सामायिकतेचे जाळे विणण्याच्या श्रीश्रींच्या सामर्थ्यात त्यांचे कर्तृत्व दिसून येते.एक मानवतावादी नेता, अध्यात्मिक गुरु आणि शांतीदूत म्हणून ओळख लाभलेले श्री श्री रवीशंकर यांचा ६६ वा जन्मदिवस 13 मे 2022 रोजी साजरा होत.
वंश, जात, पंथ, धर्म आणि आर्थिक अशा वेगवेगळ्या स्तरावर विभागलेल्या या जगतात शांती आणि मानवीय मूल्ये प्रस्थापित करणे हे आत्तापर्यंत कधीच एवढे महत्त्वाचे मानले गेले नव्हते. जागतिक महामारीनंतरच्या काळात साऱ्या जगाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, जसे की आपल्या प्रियजनांचा मृत्यू, आर्थिक संकट, सामाजिक सुसंवादाचा अभाव आणि मानसिक आरोग्याची क्षती. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या वैज्ञानिक अहवालानुसार, कोविड-१९ महामारीच्या पहिल्या वर्षी मानसिक अस्वस्थता आणि नैराश्याचे प्रमाण संपूर्ण जगात तब्बल २५ टक्क्यांनी वाढले होते.
या नव्या प्रकारच्या आव्हानांशी आपण झुंजत असतानाच यातून सुटका आणि सांत्वन करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि त्याची सहसंस्था आयएएचव्हीचे प्रणेते आणि आध्यात्मिक व गुरू श्री श्री रविशंकर देश आणि धर्माच्या सीमा पार करून अविरत कार्य करीत आहेत.
महाराष्ट्रात तणावमुक्ती आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, ग्रामीण विकास कार्यक्रमासारखे शिक्षण आणि सेवा उपक्रम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रकल्प, युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबीर, कौशल्य प्रशिक्षण, नैसर्गिक शेती असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
कोविड काळातील मदत
२०२० मध्ये जेव्हा कोविडची पहिली लाट आली तेव्हा गुरुदेवांनी लगेच क्रियाशील होत आयएएचव्हीद्वारे नेतृत्व आणि मार्गदर्शन करीत वसई, विरार, नालासोपारा, गोवंडी आणि धारावी भागातील जवळपास १५ लाख स्थलांतरित कामगारांना मोफत भोजन पुरविण्याची कामगिरी बजावली. उपासमारीमुळे दिल्लीत जसा स्थलांतरितांचा लोंढा निघाला, तसे इथे घडू नये म्हणून मुंबई, पुणे भागातील स्थलांतरित कुटुंबातील २८०००० लोकांना दहा दिवस पुरेल इतक्या धान्याच्या ७५००० किट्सचे वाटप करण्यात आले. राज्यातील नागपूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, शिरपूर भागात वीस हजारांहून अधिक धान्याच्या किट्सचे वितरण करण्यात आले. आयएएचव्हीच्या स्वयंसेवकांनी जनमानसात सजगता निर्माण करीत समुपदेशनाचे काम केले आणि स्थलांतर करू पाहणाऱ्या कुटुंबांची यशस्वीरित्या मने वळवत त्यांना तिथेच थांबायला लावले.
आयएएचव्ही संस्थेने शासनाने आखून दिलेल्या कोविड काळात पाळायच्या नियमावलीच्या मोहिमेला चालना दिली. ठाणे महानगरपालिकेला ९००० कापडी मास्क दिले. तसेच पुणे महानगरपालिकेला ३०० इन्फ्रारेड थर्मामिटर्स, २००० एन 95 मास्क, २००० पीपीई किट्स आणि स्वाब बूथ देणगी रूपाने दिले.
नद्यांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता मोहीम
गेल्या ३०० वर्षांपासून मृतप्राय असलेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे गुरुदेवांचे प्रयत्न आणि प्रेरणा प्रशंसनीय ठरल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या २९ नद्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. या प्रकल्पाद्वारे गाळ उपसून २३९८ कोटी लिटर्स पाणी राज्यभरात साठवले गेले आहे. पाण्याच्या पुरवठ्याचे सातत्य शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्न देणारे ठरले आहे. यामुळे शेतकऱ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण घटले आहे.
पुनरुज्जीवीत केलेल्या नद्यांमध्ये घारणी, वाकी, तेरणा, राजेगावी, बेनितुरा, बोरी, तवरजा, वेणा, वाघाडी, पांझन, कल्की, शिवनदी, जाना, मुदगल, मांजरा, रेना, नरोला, गलहटी,गोमाई, शिवगंगा आणि मनगंगा आदी नद्यांचा समावेश आहे.
२०२१मध्ये आयएएचव्हीद्वारे १९ जिल्ह्यात १३०००हून अधिक शौचालये बांधण्यास आणि ५० हून अधिक गावांना हागणदारीमुक्त करण्यास मदत करण्यात आली.
गुरुदेवांनी सेंद्रिय शेतीच्या मोहिमेची सुरुवात करून दिली ज्यामुळे शेतकरी नैसर्गिकरित्या शाश्वत शेती करीत अधिक लाभान्वित होतील. २००६ मध्ये विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचे कार्य केल्याबद्दल आयएएचव्ही संस्था कौतुकास पात्र ठरली. गेल्या पाच वर्षात ६१,४००हून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. नैसर्गिक शेतीच्या तंत्रामुळे हेक्टरी उत्पादन तर वाढलेच, सोबत जमिनीचा पोत ही सुधारला. नैसर्गिक शेतीच्या तंत्रासोबत आयएएचव्हीच्या स्वयंसेवकांनी व शिक्षकांनी त्यांना तणावमुक्त होण्यासाठी स्वास्थ्य आणि श्वास शिबिरे घेतली.
शिक्षण
महाराष्ट्रात ही संस्था ‘गिफ्ट अ स्माईल’ प्रकल्पाद्वारे दहा विनामूल्य शाळा चालवित आहे. यात २०७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रकल्पाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे ही संस्था मुलांच्या शिक्षणाचा खर्च तर उचलतेच, सोबत त्यांना विनामूल्य गणवेश, येण्याजाण्याची सोय, ताजे, गरम भोजन पुरवते. मुले भोजन घरी सुद्धा घेऊन जाऊ शकतात. असाच एक ‘शाळा दत्तक योजना’ प्रकल्प केप जेमिनी आणि बँक ऑफ न्यूयॉर्क च्या सामाजिक सहायता निधीतून राबवला गेला याचा विशेष उल्लेख करावा लागेल. २०१४ मध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ठाणे, नवी मुंबई, शिरूर आणि पिंपरी/चिंचवड येथील ३० हून अधिक नगर पालिका/जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेण्यात आल्या.
महिला सक्षमीकरण
ही संस्था महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, फलटण, सांगली आणि रत्नागिरी भागात केवळ ३-४ महिन्यात ‘स्त्री सौख्य’ प्रकल्पाअंतर्गत २००० हून अधिक महिलांना लाभान्वित केले गेले. स्त्रियांना ‘मासिक पाळी आणि स्वच्छता’ बाबत जागरूक करण्यासाठी २०१० मध्ये ‘स्त्री सौख्य’ प्रकल्पाचा आरंभ झाला, ज्यात समाजातील महिलांना हाताने बनवलेले नॅपकिन्स वाटप करण्यात येत असत. २५ हजारहून अधिक महिलांना आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि गावातील साफसफाईशी निगडित समस्या कशा सोडवायच्या याबद्दल जागरूक करण्यात आले.
आपत्ती निवारण
२०२१ मध्ये अचानक आलेल्या महापुरात २४५ लोकांना जीव गमवावा लागला आणि राज्यातील एक लाखाहून अधिक कुटुंब विस्थापित झाली. कोल्हापूर आणि सांगली येथील महापुराच्या वेळी आयएएचव्हीच्या स्वयंसेवकांनी ४२ गावातील ३२ हजाराहून अधिक लोकांना मदतीचा हात दिला. त्यांनी २८५०० लिटर पिण्याचे पाणी, ५४०००किलो धान्य, २१००० अन्नाची पाकिटे, ६२०० रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किट्स, ३४०० सॅनिटरी नॅपकिन्स, ११००० कपडे, १२००० अंथरूण, २१०० हून अधिक मेडिकल किट्स आणि ३५०० हून अधिक स्वच्छता किट्सचे वितरण केले.
तणावमुक्त आणि रोगमुक्त समाजाचा संकल्प घेतलेल्या आपल्या गुरुंच्या ध्येयाने प्रेरित होत आयएएचव्हीचे स्वयंसेवक पूर्णपणे समर्पित भावाने समाजाची सेवा करीत आहेत.