रेल्वेची विशेष सेवा, आता ट्रेनमध्ये बिनधास्त झोपा

0

मुंबई : भारतीय रेल्वेने ग्राहकांच्या गरजा ओळखून वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत. आता आणखी एक सेवा देण्याच्या तयारीत आहे. आता ट्रेन सुटण्याची भीती नसणार आहे. कोणत्याही स्टेशनवर उतरण्याची चिंता तुम्हाला राहणार नाही. कारण तुम्हाला आता रेल्वेकडूनच स्टेशन येण्याआधी अलर्ट मिळणार आहे. स्टेशन येण्याआधी 20 मिनिटं रेल्वे तुम्हाला जागं करणार आहे. त्यामुळे तुम्ही स्टेशनवर आरामात उतरु शकणार आहात. जाणून घेऊया रेल्वेच्या खास सुविधेबद्दल. रेल्वेच्या या विशेष सेवेचे नाव ‘डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म’ आहे. अनेक वेळा ट्रेनमध्ये लोकांना झोप येते आणि त्यामुळे स्टेशन चुकते. या अडचणीवर मात करण्यासाठीच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे सहसा रात्रीच्या वेळीच होते. रेल्वेने 139 क्रमांकाच्या चौकशी सेवेवर ही सुविधा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी चौकशी प्रणाली क्रमांक 139 वर अलर्ट सुविधा मागू शकतात.

20 मिनिटं आधी मिळणार अलर्ट
या सेवेचा लाभ कोणताही प्रवासी घेऊ शकतो. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. रेल्वेकडून या सेवेसाठी 3 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तुम्ही जर ही सेवा घेतली तर 20 मिनिटं आधी तुम्हाला फोन करून रेल्वे अलर्ट देणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्टेशनवर उतरण्यासाठी मदत होईल आणि स्टेशन चुकणार नाही.

ह्या सेवेचा लाभ कसा घ्याल?
‘डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म’ सेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांना IRCTC हेल्पलाइन 139 वर कॉल करावा लागणार आहे. कॉल आल्यावर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल.डेस्टिनेशन अलर्टसाठी आधी 7 नंबर आणि नंतर 2 नंबर डायल करावा लागेल. ह्या प्रक्रियेनंतर प्रवाशांकडून 10 अंकी पीएनआर क्रमांक विचारला जाईल. पीएनआर नंबर अपलोड केल्यानंतर, तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी 1 डायल करावा लागेल. या प्रक्रियेनंतर, सिस्टम PNR नंबरची पडताळणी करेल आणि वेकअप अलर्ट फीड करेल. त्यानंतर प्रवाशाच्या मोबाईलवर SMS येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.