68 व्या वर्षात पदार्पण करतांना

0

1955 साली कै. वामन हरी देशपांडे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पूर्णपणे वाहिलेले लोकशाही हे वृत्तपत्र सुरु केले. 1960 ला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 1970 साली लोकशाही वृत्तपत्राची मालकी सौ. शांता वाणी यांना दिली. त्यानंतर सौ. शांता वाणी यांनी त्यांच्या संपादनाखाली भुसावळ येथून व्दि साप्ताहिक, साप्ताहिक, सायं. दैनिक आणि त्यानंतर दैनिक स्वरुपात नियमित प्रकाशित होत आहे. ते अद्यापर्यंत कसलाही खंड न पडता दै. लोकशाही वाचकांच्या सेवेत सुरु आहे. महिला संपादकाने स्वतंत्रपणे चालवलेले खान्देशाच्या मातीत रुजलेले दै. लोकशाही आज 68 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

खानदेशातील विशेषतः जळगाव जिल्हयातील लाखो वाचकांचा ते आवाज बनला हे विशेषत्वाने नमूद करणे आवश्यक आहे. भुसावळ तालुक्यासाठी असलेले दै. लोकशाही नंतर जळगाव जिल्हयाच्या ठिकाणहून सुरु करण्यात आला. काळानुरुप बदल स्वीकारुन लोकशाही सप्तरंगात प्रकाशित होऊ लागला. वाचकांना जे हवे ते देण्याचा दै. लोकशाहीतर्फे कसोशीने प्रयत्न होत असून, जळगाव शहरासह जिल्हयातील सर्वांच्या अडीअडचणीचा तो पहारेदार बनलाय यात अतिशयोक्ती नाही.

व्यापार-उद्योग ,शेती-शेतकरी-शेतमजूर, कामगार, गोर-गरीब-दलित, वंचित त्याचबरोबर शिक्षण, साहित्य, कला-संस्कृती, लोकांचे आरोग्य, राजकारण-समाजकारण याबाबत ती सजगतेचा पहारेकरी बनलाय. अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न प्रयत्न करणे, चांगल्या गोष्टीचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन देण्याची भुमिका दै. लोकशाहीची राहिलेली आहे, आणि ती यापुढेही राहील. त्यामुळे वाचकांना दै. लोकशाही आपलासा वाटतो. जिल्हयातील तसेच परिसरातील व्यापार-उद्योग-रोगार वाढीसाठी दै. लोकशाही सतत अग्रेसर असतो.

दै. लोकशाही मुद्रित वृत्तपत्र माध्यम म्हणून आघाडीवर तर आहेच, त्याचबरोबर डिजिटल माध्यमातही लोकशाहीने भरारी घेतली आहे. ई पेपर, ई पोर्टल, लोकशाही लाईव्ह, फेसबुक लाईव्ह, युटयूब आदि डिझिटल माध्यमात चांगलीच मजल मारली आहे. दै. लोकशाहीचे संचालक राजेश यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली डिजिटल मिडिया कार्यरत आहे. तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण असा सुसज्ज स्टुडिओ दै. लोकशाहीच्या कार्यालयात उपलब्ध आहे. या स्टुडिओत अनेक विविध चर्चा सत्र, मुलाखती घेतल्या जातात. त्याचे चित्रीकरण आणि सादरीकरण नॅशनल चॅनलशी तुलना होईल. अशा प्रकारच्या दर्जेदार असतात. ऑडिओ बातमीपत्र सुध्दा देण्यात येते.

व्यक्तिगत, संस्थाच्या डॉक्युमेंट्रीसाठी दै. लोकशाहीचे डिझिटल माध्यम अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत यावल-रावेर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या निवडणूक प्रचाराच्या डॉक्युमेंट्रीज मतदार संघातील गावोगावी लक्षवेधी ठरल्या. आ. शिरीषदादा चौधरींच्या विजयात त्याचा खारीचा वाटा ठरला. तीच परिस्थिती पाचोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार किशोरअप्पा पाटील यांचे बाबतीत म्हणता येईल. मतदार संघात गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या विकासकामांचे चित्रीकरण प्रत्येक गावातील ग्रामस्थापर्यंत पोहोचण्याने आ. किशोरअप्पच्या विकास कामांना पावती मिळाली. अशा प्रकारे व्यवसायिक डॉक्युमेंट्रीमध्ये सुध्दा लोकशाहीने आघाडी घेतली हे येथे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. जळगाव जिल्हयातील तालुका निहाय लोकशाहीच्या वार्ताहरांची टीम कार्यरत आहे. प्रत्येक ठिकाणची बातमी प्रत्यक्षदर्शी वार्ताहरांकडून दिली जाते.

दै. लोकशाहीच्या 68 व्या वर्धापनदिना निमित्त ‘नेक्स्ट जनरेशन’ हा आगळावेगळा विशेषांक आजपासून दररोज आठ पानी प्रकाशित करण्यात येत आहे. नेक्स्ट जनरेशनला वाचकांकडून तसेच जाहिरातदारांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. नेक्स्ट जनरेशन विशेषांक आपल्याला देतांना विशेष मनस्वी आनंद होत आहे.

– धों.ज.गुरव
सल्लागार संपादक

Leave A Reply

Your email address will not be published.