निवडणुक आचारसंहिता लागल्याने पंचनाम्याला खोडा 

शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीची पंचनामाची प्रतीक्षा 

0

 

सोयगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

आगामी विधानसभा निवडणुका आणि त्यासाठी जाहीर झालेली आचारसंहिता यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पंचनामे अद्यापही रेंगाळली आहे.

आचारसंहिता सुरू होताच बुधवार पासून निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठीच्या प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठका आणि नियोजन दौरे सुरू झाले आहे. त्यामुळे मनुष्यबळ अभावी सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे रेंगाळली आहे.

बनोटी आणि जरंडी या दोन्ही मंडळांना रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही मंडळात कपाशी व मका पिकांची मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही या नुकसानीच्या प्राथमिक अहवाल जिल्हाप्रशासनाकडे सादर झालेला नव्हता, त्यामुळे बनोटी आणि जरंडी या दोन्ही मंडळातील शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षा लागून आहे. रविवारी रात्री बनोटी मंडळात ७० मिनिटात ४३ गावात १०० मी. मी. पावसाने शतकी आकडेवारी गाठली आहे. त्यामुळे या भागातील ४३ गावांना फटका बसला आहे.

दरम्यान शासनाच्या निकषाप्रमाणे एकाच दिवसात १०० मी. मी. पाऊस झाल्यास त्या मंडळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची निकष आहे. त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे बनोटी मंडळ ओल्या दुष्काळच्या छायेत आहे. परंतु आगामी निवडणुका आणि आचारसंहिता जाहीर झाल्याने या हालचाली ठप्प झाल्या आहे. निवडणूकसाठी महसूल पंचायत आणि कृषी चे अधिकारी व कर्मचारी नियुक्त झाले आहे. त्यामुळे नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने पंचनामे ठप्प झाले असून प्राथमिक नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे अद्यापही सादर झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या मदतीपासून शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे.

तालुका कृषी अधिकाऱ्याचीही बदली

दरम्यान आचारसंहिता जाहीर होण्याच्या आत सोयगावचे तालुका कृषि अधिकारी मदन सिसोदिया यांचीही बदली झाल्याने पुन्हा अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे बुधवारपासून तालुका कृषी विभाग प्रभारी तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.