ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंडळ अधिकारी व तलाठी रिक्त
शेतकऱ्यांची अनेक कामे रेंगाळली : जिल्हा प्रशासनाला विसर
सोयगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर जरंडी सज्जासाठी चक्क तलाठी व मंडळ अधिकारी हे पद रिक्त आहे. गेल्या तीन महिन्यापासून जरंडी सज्जा व मंडळाला ही दोन कर्मचारी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे रेंगाळली आहे. आचारसंहिता सुरू झाल्यावर नवीन अधिकारी नियुक्त करण्यात येत नाही. त्यामुळे आगामी निवडणुक तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांविना होऊ घातल्या जाणार आहे.
जरंडी हे महसूल मंडळ आहे. या मंडळात सिल्लोड आणि कन्नड विधानसभा मतदार संघाचे असे १८ गावे समाविष्ट आहे. परंतु या मंडळात तलाठी व मंडळ अधिकारीच नसल्याने जिल्हा प्रशासनाला चक्क या मंडळाचा विसर पडला आहे. सध्या या भागात अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे. तलाठी व मंडळ अधिकारी विना या मंडळमधील बाधित क्षेत्राचे पंचनामे रखडली आहे. दरम्यान आगामी आठवड्यात आचारसंहिताची घोषणा झाल्यास नुकसानीचे पंचनामे ही होणार नाही. शिवाय तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवीणा या भागात निवडणुकीसाठी मतदान होईल ही गंभीर बाब आहे.
दरम्यान आचारसंहिता आधीच या मंडळात शेतकऱ्यांची कामे तुंबली आहे. त्यामुळे अजुनच चिंता वाढली आहे. याबाबत तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांचेशी संपर्क साधला असता जरंडी मंडळ व सज्जेसाठी प्रभारी तलाठी व मंडळ अधिकारी यांची आदेश काढले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु हे प्रभारी तलाठी व मंडळ अधिकारी कधीच मंडळ सज्जे वर फिरकले नाही.