सोयगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर चक्क बिबट्या आल्याने पंधरा मिनिटे पालकमंत्र्यांचा ताफा अडवून ठेवल्याची घटना मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास हळदा घाटातील वेताळवाडी किल्ल्या जवळ घडली.
दरम्यान चालकाच्या सतर्कतेमुळे पालकमंत्री यांचे वाहन बिबट्या जवळच उभे राहिल्यावर तातडीने गाडीच्या काचा लावण्यात आल्याने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चक्क गाडीतून जवळून बिबट्या पहिला.
सिल्लोड वरून सोयगावला मुक्कामी येतांना पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उंडनगाव येथील कार्यक्रम आटोपून सोयगावकडे जात असताना हळदा घाटात रस्त्यावर वेताळवाडी जवळ बिबट्याने चक्क पालकमंत्री सत्तार यांच्या वाहनाला आडवा झाला. दरम्यान सत्तार यांच्या वाहनाला ब्रेक लावताच त्यांच्या पाठीमागील ताफा ठप्प झाला होता. बिबट्या मात्र डरकाळ्या काढत पालकमंत्री सत्तार यांच्या वाहन जवळ उभाच होता. तातडीने ताफ्यातील मागील वाहनांच्या लाईटचा फोकस बिबट्या वर मारून त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तब्बल पंधरा मिनिटे पेक्षा अधिक वेळ बिबट्या रस्त्यावर आडवा होता. त्यामुळे सर्वांची घबराट उडाली होती. अखेर बिबट्याने घाटातील जंगलात धूम ठोकल्या वर पालकमंत्री सत्तार यांनी सुटकेचा श्वास सोडून सोयगाव कडे प्रस्थान केले.
दरम्यान मंगळवारी रात्री पालकमंत्री यांच्या ताफ्याला बिबट्या आडवा झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे बुधवारी सोयगाव वनविभागाने बिबट्याची शोध मोहीम हाती घेतली होती. मात्र बुधवारी चार वाजेपर्यंत बिबट्या वनविभागाला हाती लागला नव्हता. त्यामुळे या घाटातून रस्त्यावर जातांना वाहनधारकांना काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगावसह वेताळवाडी, गलवाडा आदी भागातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.