सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयगाव तहसील कार्यालयात मंगळवारी निराधार लाभार्थ्यांनी मानधन बंद पडल्याने e-KYC साठी मंगळवारी सायंकाळी उशिरा पर्यंत सोयगाव तहसील कार्यालयात तोबा गर्दी केली होती. मात्र तहसील कार्यालयात खासगी संगणक परीचालकांनी या वृद्धांची e-KYC साठी सर्रास आर्थिक लूट केल्याचा आरोप वृद्ध लाभार्थ्यांनी केला आहे.
संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचा लाभार्थ्याना आता शासनाने आधार लिंकिंगवर मानधन अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्यापही काही लाभार्थ्यांनी e-KYC न केल्याने त्यांचे माहे फेब्रुवारीचे मानधन खात्यात जमा झाले नव्हते. त्यामुळे मानधन बंद होण्याच्या भीतीने मंगळवारी तालुक्यातील लाभार्थ्यांनी सोयगाव तहसील कार्यालयात e-KYC साठी तोबा गर्दी केली होती. मात्र सोयगाव तहसीलच्या संजय गांधी श्रावण बाळ योजना विभागात नियोजना अभावी लाभार्थ्यांची फरफट झाली.
काही खासगी संगणक परीचालक यांनी या लाभार्थ्यांकडून e-KYC पोटी तब्बल शंभर ते दीडशे रु ची उकळणी केली आहे. दरम्यान सोयगाव तहसील कार्यालयात हा प्रकार सर्रास सुरू होता. तरीही संबंधित नायब तहसीलदार यांनी हा प्रकार थांबविला नव्हता, त्यामुळे यामध्ये महसूल अधिकारी ही सामील असावे असा अंदाज लाभार्थ्यांनी वर्तविला आहे.
मात्र या आर्थिक लुटीतून सोयगाव तहसील कार्यालयात मंगळवारी मोठी माया कुंजी जमा झाल्याचे बोलले जात आहे. यावर निर्बंध कोण घालेल असाही प्रश्न उपस्थित राहिला असून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे, अनिल लोखंडे यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांचेकडे तक्रार केली आहे. याबाबत तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिउत्तर दिले नाही.