सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयगावसह परिसरात शेती शिवारात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे हताश झाला आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जागता पहारा करावा लागत आहे. यासाठी फटाक्यांचा आवाज तसेच स्पिकरद्वारा कुत्रे भुकंण्याचा आवाज अशा प्रकारे उपाययोजना करावी लागत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र रब्बी पिके बहरली आहेत.
यंदा चांगल्या उत्पनाची आशा शेतकऱ्यांना लागून आहे. मात्र सोयगाव, वेताळवाडी, घोसला,जरंडी, धिंगापूर आदी शिवारात वन विभागाच्या हद्दीला लागून असलेल्या जमीन परिसरात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे वैतागले आहेत. वन्यप्राणी रब्बीची पिके तुडवीत आहेत. यामुळे तोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये यासाठी सोयगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जागते रहो असा पहारा करावा लागत आहे.
सोयगाव तालुक्यात खरीप व रब्बी हंगामात वन्यप्राण्यांकडून नुकसान होते. यामुळे वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे. सोयगावसह परिसरातील शिवारात हरणी, रोही, रानडुक्कर, नीलगाई आदी वन्यप्राण्यांचे कळपचे कळप आहेत. या वन्यप्राण्यांपासून मोठा धोका निर्माण होत आहे. हे वन्यप्राणी रब्बी पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत. काही पिके खाऊन फस्त करतात. तर काही पिके पायाखाली तुडवितात. रात्रीच्यावेळी तर बिनधास्त शेतशिवारात त्यांचा मुक्त संचार असतो. वन्यप्राणीपासून पिकांचे संरक्षणसाठी शेतकरी समुहासुमहाने रात्रभर शेतात मुक्कामाला राहत आहेत. फटाक्यांचा आवाज, स्पीकरच्या माध्यमातून कुत्रा भुंकण्याचा आवाज यासह विविध उपाययोजना करीत पिके वाचविण्याची धडपड करीत आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे