सुरेश दादांचा उत्तराधिकारी : काही नावे चर्चेत

0

 

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्ह्याचे नेते सुरेश दादा जैन (Jalgaon district leader Suresh Dada Jain) यांचे साडेतीन वर्षानंतर जळगाव शहरात आगमन झाले आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा माहोल बदलला. राजकीय कार्यकर्त्यांच्या उत्साहाला जणू भरते आले आहे.. गेली दहा वर्षे न्यायालयीन लढायचा सामना करण्यात व्यस्त असलेले सुरेश दादा राजकारणापासून अलिप्त होते. आता पुन्हा सक्रिय राजकारण करण्याची त्यांनी अनिच्छा व्यक्त केली असून मार्गदर्शक व सल्लागार म्हणून कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे कार्य ते करू इच्छितात. त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या राजकीय सक्रिय राजकारणाला होणारा विरोध हे एक प्रमुख कारण असले, तरी वाढत्या वयोमानानुसार सुद्धा ते अलिप्त राहू इच्छेतात. असे असले तरी त्यांचे कार्यकर्ते तसेच चाहत्यांकडून सुरेश दादांची सक्रिय राजकारणात एन्ट्री व्हावी असा आग्रह कायम आहे..

याबाबत दादांकडून लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट होईल. तथापि सुरेशदादा जैन यांनी आपला राजकीय वारस तथा उत्तराधिकारी म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या नावाला पहिली पसंती असल्याची भावना व्यक्त केली आहे.. तत्पूर्वी जैन उद्योग समूहाचे संस्थापक कै. भवरलाल जैन हे हयात असताना त्यांच्याकडे सुरेश दादांनी आपली इच्छा व्यक्त करून अशोक भाऊंच्या नावाविषयी आग्रह धरला होता. त्यावेळी कै. भवरलाल जैन यांनी त्याला स्पष्ट नकार दिला होता. उद्योग सोडून राजकारण करणे हा आपला धंदा नाही, असे कै. भवरलाल जैन यांचे स्पष्ट म्हणणे होते. त्यामुळे कैलासवासी मोठ्या भाऊंचे संस्कार त्यांच्या चारही मुलांवर रुजलेले आहेत. त्यामुळे अशोक भाऊंचा उद्योगासह राजकारण करण्याचा पिंड जरी असला तरी ते उद्योग सोडून राजकारणात येतील असे वाटत नाही. याबाबत अशोक भाऊ कडून सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट होईल. परंतु ती भूमिका नकारार्थी असेल एवढे मात्र निश्चित. त्यामुळे सुरेश दादांनी अशोक भाऊंच्या नावाला पहिली पसंती दिली असली तरी दादांनी दुसऱ्या पसंतीचे नाव अथवा दादांचे उत्तराधिकारी म्हणून ज्या काही नावांची चर्चा होते आहे., त्यातून एखादा उत्तराधिकारी म्हणून नाव जाहीर करावे लागणार आहे.

सुरेश दादांचा वारस अथवा उत्तराधिकारी म्हणून नाव जाहीर करणे दादांना सुद्धा फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणारे आहे.. अशोक भाऊंच्या नावाला पहिली पसंती दादांनी दिली. त्याला कुणाचाच विरोध होऊ शकणार नाही. कारण अशोक भाऊ हे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. परंतु राजकीय कार्यकर्त्यांमध्ये दादांचा उत्तराधिकारी म्हणून अनेक नावांची चर्चा होत आहे. त्या नावांमधून दादांना आपला उत्तराधिकारी निवडायचा आहे. दादांचा उत्तराधिकारी म्हणून नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते असलेले डॉ. सुनील महाजन, माजी महापौर नगरसेवक नितीन लढ्ढा ही नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. तिघेही सुरेश दादा जैन यांचे कट्टर समर्थक असून या तिघाही जळगाव शहरवासीयांचा अभ्यास चांगला आहे. त्यांना महापालिकेतील कारभाराचा अनुभव सुद्धा दांडगा आहे. सुरेश दादांच्या अनुपस्थितीत या तिघांनी दादांचे प्रतिनिधित्व अत्यंत उत्तमरीत्या पार पाडले आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती झाल्यामुळे जळगाव शहराची जागा भाजपच्या वाट्याला आल्याने शिवसेनेला ही जागा सोडून भाजपचा विचार करावा लागला. त्यामुळे जळगाव शहराचा जागेसाठी शिवसेनेचा उमेदवार म्हणून विष्णू भंगाळे यांचे नाव जवळजवळ निश्चित होते. 2014 ते 2019 या कालावधीत आमदार राजू मामा भोळे यांच्या कारकिर्दीवर भयंकर नाराजीचा सूर होता. भाजप सेना युती झाली नसती तर जळगाव शहर विधान सभेचे चित्र 2019 मध्ये वेगळेच पाहायला मिळाले असते. यामुळे त्यावेळी शिवसेनेचे हुकलेली संधी आता 2024 च्या निवडणुकीत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जळगाव शहर मतदार संघात यंदा सुरेश दादांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार बाजी मारू शकतो त्यामुळे सुरेश दादांचा उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव पुढे येईल याला फार महत्त्व प्राप्त होणार आहे.

नगरसेवक डॉ. सुनील महाजन हे एक उच्चशिक्षित अनुभवी व्यक्तिमत्व आहे. ते माजी उपमहापौर सुद्धा राहिलेले आहेत. सध्या त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री महाजन या महापौर म्हणून कठीण काळात चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. विशेष म्हणजे हे जोडपे दादांचे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहे. तिसरे उमेदवार नितीन लढ्ढा हे अनुभवी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते गेल्या अनेक वर्षापासून सुरेश दादाच्या समवेत काम करीत असून सुरेश दादांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यांना मिळालेले महापौर पद हे लक्षवेधी ठरले होते. जळगावकरांना असा महापौर हवा असताना त्यांचा राजकीय बळी घेतला गेला, अशी लोकभावना आहे. त्यामुळे ही तीन नावे अशोक भाऊंच्या नावानंतर चर्चेत आहेत. पाहूया कोणाचे नाव जाहीर होते….!

Leave A Reply

Your email address will not be published.