साबरमती एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये जवानाची हत्या
राजस्थानच्या बीकानेर रेल्वे स्टेशनजवळ घडली घटना
लोकशाही न्यूज नेटवर्क
धावत्या ट्रेनमध्ये लष्कराच्या जवानाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. राजस्थानच्या बीकानेर रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. प्रवासादरम्यान रात्री उशिरा कोच अटेंडेंटसोबत वाद झाला. या वादानंतर संतप्त झालेल्या कोच अटेंडेंटने चाकूने सपासप वार करत जवानाला संपवलं. या घटनेमुळे राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, साबरमती एक्स्प्रेसमधील स्लीपर कोचमध्ये ही घटना घडली. रविवारी मध्यरात्री धावत्या ट्रेनमध्ये हत्येचा हा थरार घडला. गुजरातचा राहणारा जवान जिगर कुमार फिरोजाबादवरून साबरमती एक्स्प्रेसमधून बिकानेरला जात होता. याप्रवासादरम्यान कोच अटेंडेंटसोबत जवानाचा वाद झाला. या वादादरम्यान लूणकरणसर ते बीकानेरदरम्यान कोच अटेंडेंटने जवानावर चाकूने वार केले. या हल्ल्यात जवान गंभीर जखमी झाला.
जखमी जवानाला तात्काळ पीबीएम ट्रोमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारापूर्वीच जवानाचा मृत्यू झाला. जीआरपी सीआय आनंद गिला यांनी सांगितले की, ही घटना २ तारखेला घडली. ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गुजरातहून निघालेल्या फिरोजपूर-साबरमती ट्रेनमध्ये लोणकण रेल्वे स्टेशनवरून निघाल्यानंतर घडली. चाकूहल्ल्या प्रकरणी एका अटेंडेंटला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन कोच अटेंडंटना चौकशीसाठी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर वरिष्ठ लष्करी अधिकारी रात्री उशिरा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पीबीएम रुग्णालयात पोहोचले होते. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. धावत्या ट्रेनमध्ये घडलेल्या या रक्तरंजित थरारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.