मातृवेदना ! गतिमंद मुलांच्या भविष्यासाठी चिंतेत,आईने दोन्ही लेकरांसह विहिरीत घेतली उडी
सोलापूर जिल्ह्यातील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना
मातृवेदना ! गतिमंद मुलांच्या भविष्यासाठी चिंतेत, आईने दोन्ही लेकरांसह विहिरीत घेतली उडी
सोलापूर जिल्ह्यातील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दोन मुलं गतिमंद असल्याच्या तीव्र नैराश्यातून आईने दोन्ही लेकरांसह ८० फूट खोल विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं. उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथे बुधवारी (१२ मार्च) ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. मृतांमध्ये चित्रा कविराज हाके (२८), पृथ्वीराज हाके (७) आणि स्वराज हाके (दीड वर्ष) यांचा समावेश आहे.
कुटुंबाची संघर्षमय कहाणी
हाके कुटुंब मूळचं नान्नज (बार्शी रोड, सोलापूर) येथील असून, काही वर्षांपूर्वी पत्नीच्या माहेरी वांगी येथे राहायला आलं. चित्रा हाके यांच्या दोन मुलांपैकी मोठा मुलगा पृथ्वीराज हा जन्मतःच गतिमंद होता. त्यानंतर लहानगा स्वराज देखील गतिमंदच जन्माला आला. दोन्ही मुलांचं भवितव्य अंधारमय असल्याच्या चिंतेतून चित्रा गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होत्या.
विहिरीत उडी घेतली अन् गाव हादरलं!
बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजता त्यांनी गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत मुलांसह उडी घेतली. यावेळी जवळच शेळ्या चारणाऱ्या एका मुलीला काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. तिने धावत जाऊन पाहिलं असता पाण्यावर स्वराज तरंगताना दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि ग्रामस्थांनी धाव घेतली.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं असून, आईच्या हताश मनोवस्थेवर समाजाने अधिक संवेदनशील होण्याची गरज असल्याचं व्यक्त केलं जात आहे.