लोकशाही न्यूज नेटवर्क
सोलापूर :सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन. विजेच्या मागणीत पुरवठा कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत तीन तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीपंपाला बसत आहे. विजेअभावी पाणी देता येत नसल्याने उन्हाळी पिके धोक्यात येत आहेत. महावितरणने भारनियमनासाठी गावनिहाय वेळापत्रक बनविले आहे. मात्र याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.
सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात उन्हाच्या झळा हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. सोलापूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेले असून, लवकरच ४४ अंशाच्या पुढे जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सोबतच कृषिपंपांद्वारे विजेचा वापरदेखील वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरू आहे.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्येदेखील कोळशाच्या टंचाईमुळे विजेच्या उपलब्धतेमध्ये तूट निर्माण झाली होती. सध्या कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक प्रकल्पांमधून प्राप्त होणाऱ्या विजेमध्ये २०००-३००० मेगावॉटपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे.
उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याने ही मागणी यापुढे २५ हजार मेगावॉटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सर्वच ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यात समतोल राखण्यासाठी विशेषतः सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरण सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही. त्यामुळे कोणत्या तालुक्यात किती वेळेचे भारनियमन सुरू आहे याविषयीची माहिती समजू शकली नाही.
मागणीच्या तुलनेत वीजपुरवठा कमी होत असेल तर महावितरण फोर्स लोडशेडिंगच्या नावाखाली गावागावातील वीजपुरवठा तीन ते चार तास बंद करते. रोहित्रांवर भार येऊ नये, विद्युत केंद्रात बिघाड होऊ नये यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.