चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या मानवतेच्या संदेशाला उजाळा देत सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल यांच्या वतीने स्वर्गीय यश सुनील मोहुर्ले यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे रक्तदान शिबिर व रुग्णांना फळवाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून दिवंगत यश मोहुर्ले यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी स्व. यश सुनील मोहुर्ले यांच्या प्रतिमेला वनिता ऋषीजी रस्से (आजी), उपजिल्हा रुग्णालय मूल येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बंडू रामटेके तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरथ पी. उराडे यांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर अनंता रस्से (मामा), मुकुंदा रस्से (मामा) तसेच उपस्थित नातेवाईक व मित्रपरिवार यांनी पुष्प अर्पण करून स्व. यश मोहुर्ले यांना श्रद्धांजली वाहिली. आयोजित रक्तदान शिबिरात ४४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले, ज्यातून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित झाला.
याच वेळी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूलचे अध्यक्ष तन्मय तिरथ उराडे, उपाध्यक्ष अंकुश सुनील वाणी, सचिव संकल्प मनोहर गणवीर, सहसचिव जय पुरुषोत्तम मोहुर्ले, कोषाध्यक्ष प्रतिक अनंत लेनगुरे तसेच सदस्य भैरवी संतोष सहारे, दिशा मदन शेंडे, ओमकार विलास शेंडे, शिव विलास शेंडे आदी उपस्थित होते.
प्रसंगी समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशनच्या कार्याचे कौतुक केले. समाजहितासाठी असे उपक्रम सातत्याने व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

