…म्हणून मी स्वागताला उभा राहिलो!

आदित्य ठाकरेंची मिश्कील टीपणी : फडणवीस म्हणाले ती तर गंमत

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई : विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली. तर त्याच रात्री माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अचानक समोरासमोर आले, तेव्हा आदित्य यांनीही मिश्किल कमेंट केली.

‘उद्धवजी, आता 2029 पर्यंत काही करायचे नाही. आम्हाला तिकडे (विरोधी पक्षात) यायचा पर्याय उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे (सत्तेत) येण्याचा पर्याय आहे. त्यावर वेगळा विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू’, अशी मिश्कील टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर दिवसभर विधानभवन व एकूणच राजकीय क्षेत्रात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपानिमित्त फडणवीसांनी दिलेल्या ‘ऑफर’चीच चर्चा सुरू होती.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ऑगस्ट 2025 अखेरीस संपत असून त्यानिमित्ताने त्यांना बुधवारी सायंकाळी परिषद सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी सत्ताधारी-विरोधकांनी एकमेकांना जोरदार कोपरखळ्या, चिमटे घेतले. निरोप समारंभाची सुरुवात फडणवीस यांच्या भाषणाने झाली. ‘दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्ववाची कडवी भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. भोंग्यांविरोधात त्यांनी अनेक निवेदने दिली. ते कट्टर सावरकरवादी आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला बसले असले तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत’, अशी कोपरखळी त्यांनी पाटील यांनाही मारली.

काय झाला संवाद?

     आदित्य ठाकरे : तुम्ही ऑफर दिली म्हणून मी स्वागताला उभा राहिलो…

     (देवेंद्र फडणवीस यांनी हसत हात मिळवला)

     पत्रकार : काय झाले का नक्की? काय बोललता तुम्ही नेमके?

     देवेंद्र फडणवीस : मी गंमत केली, थोडा लाईट मूड असला पाहिजे

     देवेंद्र फडणवीस (आदित्य यांना) : चलू?

     आदित्य ठाकरे : ओके

Leave A Reply

Your email address will not be published.