पोदार इंटरनॅशनल स्कुलचे १३ वे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

0

लोकशाही न्युज नेटवर्क
पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘कृष्ण कथाए,चलो कृष्ण की नगरी..” जल्लोषात झाले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित जळगावचे पोलीस अधीक्षक राजकुमार मेघनाथन ,शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन उपस्थित होते.
शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाची प्रस्तावना फाल्गुनी चव्हाण,मनस्वी बडगुजर ,स्वरूप चिरमाडे व समृद्धी संदानशिव या विद्यार्थिनींनी मांडली. शाळेचे उप-प्राचार्य दीपक भावसार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

प्रमुख पाहुणे व मंचावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत श्री सरस्वती मूर्तीचे पूजन करून दीपप्रज्वलनाने शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी,पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले.

यावेळी शैक्षणीक,स्पर्धा परीक्षा,क्रीडा प्रकार तसेच कला ई. क्षेत्रात महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य गोकुळ महाजन यांनी शाळेचा वार्षिक अहवाल पालकांसमोर प्रस्तुत केला. शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी,क्रिडा प्रतिनिधी या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे जळगावचे पोलीस अधीक्षक राजकुमार मेघनाथन यांनी पोदार स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नियमितपणा,सराव, जिद्द व चिकाटीने केलेले कोणतेही काम विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी अतिशय आवश्यक आहे म्हणून अथक प्रयत्न करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी मांडले. बुद्धिचातुर्य हा गुण आपण कृष्णाकडून घ्यावा. कृष्ण हे महाभारतातील केवळ एक पात्र नव्हे तर समग्र मानव जातीने कौटुंबिक ,सामाजिक,राजकीय जीवन जगताना कोणते मापदंड आचरणात आणावेत याचा आदर्श होय.

दर्जेदार शिक्षणासोबत प्रगत विचार ,परंपरागत मूल्यांचे संवर्धन हे संस्थेचे ध्येयवाक्य असून यावर्षीच्या ‘कृष्ण कथाए,चलो कृष्ण की नगरी..’ या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी विविध नाटिका,नृत्ये सादर केली.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकच नव्हे तर कलागुणांना वाव मिळावा म्हणून व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.

या रंगारंग कार्यक्रमातून विष्णू दरबाराची प्रतीकृती सादर केली गेली..कृष्ण जन्म,बाललीला ,कालियामर्दन, करंगळीवर गोवर्धन पर्वत धरून इंद्रदेवाचे गर्वहरण ,रासलीला,भगवान श्री कृष्णाचे मथुरेत आगमन व कंस वध ई. प्रसंग नाटिका, नृत्य तसेच गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करीत उत्तम नियोजनासाठी शालेय प्रशासनाची प्रशंसा केली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे उपप्राचार्य श्री दिपक भवसार ,पोदार जम्बो किड्स च्या मुख्याध्यापिका उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे वरिष्ठ समन्वयक हिरालाल गोराणे ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कु.योषा गांधी हिने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.