हॅलो डॉक्टर; उन्हाळ्यातील त्वचा विकार आणि उपचार

0

  लोकशाही, विशेष लेख

 

मानवी शरीराचा संपूर्ण भाग हा त्वचेने व्यापलेला असतो. अंतर्गत आणि बाह्य शरीर यामधली संरक्षक भिंत म्हणजे मानवी त्वचा असते. मानवी सौंदर्यामध्ये म्हणूनच या त्वचेला अनन्यसाधारण महत्व असते. जसजसे ऋतू बदलतात त्याप्रमाणे मानवी त्वचेमध्ये देखील बदल घडतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो परंतु असं असलं तरी मुळातच मानवी त्वचा हि अतिशय संवेदनशील असल्यामुळे बदलत्या वातावरणाचा याच त्वचेवर परिणाम हा होतच असतो. उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेले असते त्यामुळे मानवी शरीराची संरक्षक असलेल्या त्वचेवर त्याचा विपरीत परिणाम हा होतो. अति उष्णतेमुळे त्वचेच्या अनेक व्याधी निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचेवर नेमके काय दुष्परिणाम होतात ?त्यातून कोणते आजार उद्भवतात ? आणि त्यावर उपचार नेमके कोणते ? हेच जाणून घेण्यासाठी त्वचाविकारतज्ज्ञ डॉक्टर मुकुंद मगरे यांच्याशी साधलेला संवादातून व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे म्हंटले जाते.या विधानाप्रमाणेच आपल्या देशातील लोकांच्या त्वचेचे प्रकारही वेगवेगळे आहेत.

जाणून घेऊया महाराष्ट्रातील लोकांची त्वचा नेमकी कशी आहे ?

महाराष्ट्रात समुद्र किनारपट्टीपासून ५० ते ६० किलोमीटर अंतरावर वास्तव्य असलेल्या लोकांची त्वचा हि मुलायम, नाजूक असते. जसजसे ६० किमी च्या आत जाऊ त्या भागात त्वचेची नाजूकता ही राठ बनते. बाहेरून मुंबईमध्ये येणाऱ्या नागरिकांची त्वचा ही खूप राठ असते. मात्र ही व्यक्ती ६ महिने मुंबईत वास्तव्य करत असेल तर त्याची त्वचा देखील मुलायम नाजूक बनते. समुद्र किनारपट्टीजवळ हवामानाची आद्रता खूप असल्यामुळे त्वचा ही नाजूक असते. तर मराठवाडा, विदर्भ, नागपूर या भागातील लोकांची त्वचा ही शुष्क आणि राठ असते.

आयुर्वेदानुसार त्वचेचे किती स्तर असतात ?

आयुर्वेदात त्वचेचे एकूण ७ स्तर सांगितलेले आहेत. तर आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार त्वचेचे मुख्यतः ३ स्तर आहेत. यातही पुन्हा या ३ स्तराचे एकूण ६ भाग असतात. मानवी त्वचेच्या या प्रत्येक स्तरात विविध प्रकारच्या रोग आणि व्याधींचे मूळ लपलेले असते. ते जाणून घेण्यासाठीच त्वचेच्या या स्तरांचा अभ्यास महत्वाचा असतो.

मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्वचेचे अनन्यसाधारण महत्व आहे मुळात त्वचेचे कार्य नेमके काय असते ?

त्वचेचे प्रमुख कार्य म्हणजे मानवी शरीरासाठी एक आच्छादन अर्थात संरक्षक भिंत म्हणून आपली त्वचा काम करते. शरीराचे तापमान त्वचा नियंत्रित ठेवते. त्वचेच्या खालच्या टिशूचे संरक्षण करणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात हीच त्वचा व्हिटॅमिन डी ची निर्मिती करते. शरीरातील पदार्थ त्वचा घामावाटे बाहेर टाकते. त्वचेच्या माध्यमातूनच शरीरासाठी पोषक तत्व शोषली जातात. प्राणवायू वाहून नेणं, वात, पित्त, कफ दोषाचे नियंत्रण देखील त्वचा करते.

उन्हाळ्यामध्ये त्वचेचे कोणकोणते आजार उद्भवतात ?

उन्हाळ्यात मुख्यतः घामोळ्यांचा त्रास हा सर्रास जाणवतो. शरीराच्या बाहेर येणारा घाम हा शरीराच्या वरच्या बाजूला शोषला जातो, अगदी टाईट कपडे घातल्यामुळे घाम तिथेच जिरतो आणि घामोळे येतात. त्वचेला खाज येणे, त्वचा नाजूक असल्यामुळे लालसर होणे, जांघेत आणि काखेत एक्झिमा होतो. तसेच गजकर्ण, इसब असे विकार देखील केवळ अति उष्णतेमुळे उदभवतात.

या विकारावर आयुर्वेदामध्ये काय उपचार सुचविले गेले आहेत ?
आयुर्वेदाने उन्हाळ्यातील या विकारावर ऊर्ध्वातन पावडर हे उत्तम औषध सांगितलेले आहे. चंदन, वाळा, लिंब, अगरू,श्वेत, चंदन याचे चूर्ण हे आंगोळीपूर्वी आणि आंघोळीनंतर दोनदा शरीरावर लावल्याने त्वचा शांत होते. या चूर्णामध्ये मंजिष्ठतेचा वापर करावा त्यामुळे देखील फायदा होतो.

उन्हाळ्यामध्ये शरीरावर जशा घामोळ्या येतात तशा डोक्यामध्ये देखील फोड येतात त्याबद्दल थोडक्यात ? त्यावर उपाय काय आहे ?

उन्हळ्यात शरीरावर जसे घामोळे उमटतात त्याप्रमाणेच जास्त आंबे खाल्याने किंवा उष्ण पदार्थाचे सेवन केल्याने देखील डोक्यामध्ये फोड होतात. अति आंबट खाल्याने शरीरात आम्लाचे प्रमाण वाढते आणि फोड येतात. तसेच आंघोळ न केल्याने घाम अंगात जिरतो आणि घामोळे होतात. यावर उपाय म्हणजे कोरफड ही थंड असते याच कोरफडीच्या गरा मध्ये त्रिफळा, संत्रा, लिंबाची साल मिक्स करून याचा लेप हा डोक्याला लावल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो, आणि डोक्यातील फोड देखील नष्ट होतात. याबरोबरच ताक, लिंबाचे सरबत, कोकम सरबत प्यायला हवे ज्यामुळे शरीरात गारवा निर्माण होईल .

उन्हाळ्यात तहान खूप लागते आणि कितीही पाणी पिल्यानंतर तहान भागात नाही, पाण्याच्या अभावी त्वचा शुष्क होते यावर उपाय काय ?

उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याचं योग्य संतुलन असायलाच हवं. उन्हाळ्यात ६ ते ८ ग्लास पाणी प्यायलाच हवं अगदी तहान लागली नसली तरी . कारण उन्हाळ्यात डिहायड्रेशन मुले अतिशय वेगाने शरीरातील पाणी कमी होते पाण्य्ची हि कमतरता भरून काढण्यासाठीच सतत पाणी प्यावे ,शिवाय वाळा घालून केलेलं सरबत, कोकम सरबत, लिंबू सरबत ही सरबत दुपारच्या वेळी घेतल्याने शरीरामध्ये पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात राहत. आणि त्वचा देखील शुष्क होत नाही.

शेतकरी वर्ग आणि कष्टकरी वर्गाला उन्हातच काम करावं लागत त्यांनी काळजी कशी घ्यावी ?

उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना काम करणं भाग असलं तरी त्यांनी कपडे घालूनच काम करावं. शिवाय दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी, अनेकदा उन्हात काम केल्याने त्वचा काळवंडते त्यासाठीच उघड होऊन काम करणं टाळावं. आणि सतत पाणी पिणं, लिंबू, कोकम सरबत घेणं चांगलंच.

उन्हाळ्यामध्ये आहारात काय बदल करायला हवा ?

उन्हाळ्यामध्ये अनेकदा आहारात दही आणि ताकाच मोठ्या प्रमाणात सेवन केलं जात परंतु यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असल्याने शरीराची आर्द्रता वाढविण्यास मदत होते. त्यामुळेच शरीराच्या रंध्रांमध्ये घाम जमा होऊन त्वचाविकार बळावतात. त्यासाठीच शक्यतो भोजनानंतर ताक घ्यावं परंतु त्या ताकात जिरे पावडर, धने पावडर, कोशिंबिर, पुदिना, हळद घालूनच ताक प्यावं, ताक घुसळून केलेलं असेल तर उत्तम म्हणजे ते नैसर्गिक असते. शिवाय आहारात हलका आहार म्हणजे खिचडी घ्यावी. तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेच. आणि जेवल्यानंतर दुपारी अजिबात झोपू नये. कारण आपल्या शरीरातील सर्व पचन क्रिया यावेळी मंदावतात म्हणून शतपावली करावी. रात्री देखील हलका आहार घ्यावा.

उन्हाळ्यात आहाराच्या दृष्टीने कोणती पथ्य आणि अपथ्य पाळावीत ?

उन्हाळ्यात हलका आहार घ्यावा. जेवताना ताक जे नैसर्गिक असेल ते घ्यावं. भरपूर फलाहार करावा. गहू, बाजरी, भात अशा पदार्थांचा आहारात समावेश असावा. लिंबू सरबत, कोकम सरबत, वाळ्याचा सरबत प्यावं, ही सर्व पथ्य पाळावीत. आणि अपथ्य म्हणजे कोल्ड्रिंकन्स घेऊ नयेत. व्हिनेगर टाकून बनवलेली सरबत टाळावी. तसेच उन्हाळ्यात ब्रेडचा वापर टाळावा. ही अपथ्य आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.