कौशल्य प्रशिक्षण संस्थाच्या अडचणी तात्काळ सोडवणार – कौशल्य विकास व आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्र स्किल मिशन अँबेसिडर म्हणून महाराष्ट्र चेंबरची नियुक्ती करणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यातील व्हीटीपी संस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील असे आश्वासन कौशल्य विकास व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्हीटीपी संस्थांच्या अडचणी संदर्भात  कौशल्य विकास व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची भेट घेतली याप्रसंगी ते बोलत होते.

आरोग्य व कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांनी व्हीटीपी संस्थांच्या अडचणी जाणून घेऊन व्हीटीपी संस्थांचा अभ्यासक्रम अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल व महाराष्ट्र चेंबर या समितीचा स्थायी सदस्य असेल, तसेच व्हीटीपी संस्थांच्या समस्या सोडविण्याकरिता कौशल्य विकास विभागासमवेत संयुक्त बैठक आयोजित करून व्हीटीपी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन आरोग्य व कौशल्य विकास मंत्री ना. राजेश टोपे यांनी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले. तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे कौशल्य विकासासाठी सुरु असलेले उपक्रमांची माहिती समजवून घेऊन राज्यात कौशल्य विकासाच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्र स्किल मिशन अँबेसिडर म्हणून महाराष्ट्र चेंबरची नियुक्ती करण्यात येईल असे आरोग्य व कौशल्य विकास मंत्री ना. राजेश टोपे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरतर्फे झालेल्या राज्यस्तरीय कौशल्य विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष ललित गांधी यांनी आरोग्य व कौशल्य विकास मंत्री  राजेश टोपे यांच्याकडे सादर केला. अहवालाचे अवलोकन करून राजेश टोपे यांनी राज्यात कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे सुरु असलेल्या उपक्रमांचे कौतूक केले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कौशल्य विकास समिती व महिला समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात कौशल्य विकासाकरिता वेगवेगळे प्रोग्राम, सेमिनार्स, वर्कशॉप्स राबवण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच महिलांकरीता कौशल्य विकास व उद्योजकता विकास  प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत असून महिला क्लस्टरची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच व्हीटीपी संस्थांच्या अडचणी मांडल्या त्यात प्रामुख्याने MSSDS कडून 2017 पासून प्रलंबित देयके अदा करणे, लाभार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी मुदतवाढ मिळावी, परीक्षा वेळेवर घेण्यात याव्यात व निकाल वेळेवर अपलोड करण्यात यावा, करोना काळामध्ये संस्था बंद असताना (MSSDS) ने संस्थांना कारणे दाखवा व कारवाईच्या दिलेल्या नोटीसांवरील कारवाई स्थगित करून त्यावर मार्ग काढावा, व्हीटीपी संस्थांना एकच नोंदणी प्रक्रिया निश्चित करण्यात यावी व त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे आदि अडचणी मांडून  कौशल्य विकास प्रभावीपणे होण्यासाठी व्हीटीपी संस्थांच्या अडचणी सोडविण्याची मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.

शिष्टमंडळात उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, महिला समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील, व्हीटीपी असोसिएशनचे स्वप्निल शाह, चंद्रकांत सिसोदिया, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here