लोकशाही न्यूज नेटवर्क

परभणीत यशवाडी येथे हनुमान मंदिर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या सभामंडपाचा पिलर आणि छताचा काही भाग कोसळला. हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविक ठार झाले असून अनेकजण जखमी झाले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या छताच्या भागाखाली अडकल्याने 6 भाविकांचा मृत्यू झाला. तसेच 30 ते 40 भाविक अडकले होते. यातील काहीजण जखमी झाले आहेत. शनिवार असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी असते, तशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. त्यात ही घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ट्वीट करताना म्हटले की, ‘यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन, आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधून बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
घटनास्थळी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक बचाव पथके दाखल झाली असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कठीण प्रसंगी गावातील सर्व नागरिकांना आवाहन कृपया आपल्या कुटुंबीयांची व नातेवाईकांची तातडीने विचारपूस करा, अफवांपासून दूर राहा आणि प्रशासन व बचाव यंत्रणांना पूर्ण सहकार्य करा. प्रशासनाला जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे तसेच आवश्यक सर्व मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व नागरिक सुरक्षित राहावेत हीच प्रार्थना.


