सिंगापूर, पॅरिसचे स्वप्न भंगले; अन् जळगाव शहर ‘खेडे’ बनले!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीची चुरस होणार असली तरी महायुतीतर्फे निवडणूक लढविणारे बहुसंख्य उमेदवार तसेच महाविकास आघाडीतर्फे निवडनुकीस उभे असलेल्या बहुतेक उमेदवारांमध्ये; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुकीस उभे असलेले बहुसंख्य उमेदवार असले तरी, हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे एकेकाळाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे लोकप्रतिनिधी आहेत. हीच परिस्थिती विरोधी महाविकास आघाडीतील उमेदवारांबाबत आहे. परंतु जळगाव शहराच्या विकासाच्या संदर्भात सुरेशदादा जैन यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न गेल्या पंधरा वर्षापासून साकार होत नाही. आता यापुढे सुद्धा सुरेशदादांचे स्वप्न साकार होईल का? या प्रश्नाचे उत्तर सापडेल का? हा खरा नवीन प्रश्न आहे.

तब्बल 35 वर्षे सुरेशदादा जैन यांनी जळगावचे नेतृत्व केले. नऊ वेळा विधानसभेची निवडणूक लढवून जळगावचे प्रतिनिधित्व केले. नगरपालिका असलेल्या पासून ते महानगरपालिकेच्या निर्मितीनंतर त्यांनी जळगाव शहर विकासाचा ध्यास घेतला. नगरपालिका असताना नगरपालिकेची 17 मजली प्रशासकीय इमारत उभी केली. एका छताखाली नगरपालिकेची सर्व कार्यालये सुरू करून जळगावकरांची सोय केली. नगरपालिकेची 17 मजली प्रशासकीय इमारत अख्या महाराष्ट्रात फक्त जळगावत असल्याने जळगावचे नाव महाराष्ट्रभर गाजले. सुंदर जळगाव, स्वच्छ जळगाव, हिरवेगार जळगाव, करण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले होते. जळगाव शहराची सिंगापूर-पॅरिसशी तुलना होईल असे त्यांच्या स्वप्नातले जळगाव शहर होते.

महानगरपालिका पालिकेची स्थापना 2002 मध्ये झाली आणि काही अंशी शासनाकडून लोकनियुक्त नगरसेवकांच्या कारभारांवर मर्यादा आल्या. त्या आधी नगरपालिका असताना नगरपालिकेकडे स्वायत्त अधिकार होते. त्याचा पुरेपूर फायदा सुरेशदादा जैन यांनी त्यांच्या कल्पनेतून घेतला. शहरांचा विकास व्हायचा असेल तर शासनाच्या निधीतून गतिमान विकास शक्य नाही. म्हणून सुरेश दादांनी महापालिकेचे स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले. शहरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेचा वापर नगरपालिकेतर्फे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून वाढवले. नगरपालिकेचे उत्पन्न वाढले आणि शहराचा व्यापार उद्दीम वाढला. त्यातून रोजगार उपलब्ध झाले. जळगाव शहराचे हे शॉपिंग कॉम्प्लेक्स जळगाव पर्यटन म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात विशेष ओळख निर्माण करू लागले. महाराष्ट्र तसेच देशात अनेक नगरपालिकांकडून नगराध्यक्ष, नगरसेवक व अधिकारी जळगावला येऊन त्याचा अभ्यास करून जायचे. जळगाव पॅटर्न त्यांच्या नगरपालिकांमध्ये त्यांनी राबवला.

जळगाव शहरातील नगरपालिकेचे राखीव भूखंड सार्वजनिक संस्था विकासाच्या तत्वावर देऊन त्याचा योग्य तो उपयोग केला. आता गेल्या पंधरा वर्षापासून सुरेश दादांच्या सत्तेला ग्रहण लागले आणि जळगाव शहराचे नेतृत्व हरवले गेले. गेल्या पंधरा वर्षापासून जळगाव शहराचा विकास कोसो दूर फेकला गेला आहे. एकही मूलभूत विकास झाला नाही. रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता या मूलभूत नागरी सुविधांची देखील वाट लागलेली दिसून येते आहे. 2018 च्या निवडणुकीत भाजप तर्फे विकासाचे गाजर देऊन 75 पैकी 57 नगरसेवक निवडून आले. परंतु पाच वर्षात विकासाचे तीन तेरा झाले. गेल्या दोन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये तर महापालिका प्रशासन धाब्यावर बसवले गेले आहे. आता होणाऱ्या निवडणुकीत 75 पैकी 12 नगरसेवक बिनविरोध निवडून आले की ते बिनविरोध केले गेले हा प्रश्नच आहे. निवडून आलेले 12 नगरसेवक वगळता 63 नगरसेवकांच्या पदासाठी आता निवडणूक होते आहे. ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर होते आहे, असा दावा करण्यात येत असला तरी आगामी पाच वर्षात त्याचे चित्र दिसून येईल .

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगाव शहराच्या विकासाच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, ‘जळगाव शहर सिंगापूरसारखे बनवू.. पॅरिस सारखे जळगाव शहर करण्याचे स्वप्न मी पाहिले होते. परंतु ते स्वप्न भंगले आणि जळगाव शहर एक खेडे बनले आहे,’ अशी बोलकी प्रतिक्रिया सुरेशदादा जैन यांनी दिली. जळगाव शहराच्या विकासासंदर्भात सुरेश दादांनी एक आगळे वेगळे स्वप्न पाहिले होते. परंतु त्यांच्या विकासाच्या उधळल्या जाणाऱ्या वारूला राजकारणामुळे रोख लावला गेला. जळगाव शहर झोपडपट्टीमुक्त करून त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला गेला. गोरगरिबांना सिमेंट काँक्रीटचे घरे देण्याच्या त्यांच्या धाडसी निर्णयाला तंत्रिकदृष्ट्या आणि कायद्याचे बोट दाखवून आरोपीच्या पिंजऱ्यात बसविण्यात आले. त्यांचे राजकीय जीवन संपवले. परंतु आज जी काही बहुसंख्य नगरसेवक मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, ती बहुसंख्या सुरेशदादांची समर्थकच आहेत. हे कशाचे द्योतक आहे! शहराच्या विकासासंदर्भात सुरेश दादांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ‘शहरातील मतदारांनी चांगली विकासाची दृष्टी असलेले नगरसेवक निवडून द्यावेत’ असे आवाहनही केले. पाहूया घोडा मैदान जवळ आहे. काय होते ते दिसेलच!

Leave A Reply

Your email address will not be published.