पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क
नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रभर गेल्या काही दशकांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दररोज पहाटे श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. पाळधी येथेही २०२१ पासून नवरात्रोत्सव काळात या दौडीचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही दौडीचे नियोजन करण्यात आले आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि हिंदू समाजात धर्म, संस्कृती व स्वराज्याविषयी जागृती निर्माण व्हावी, हा या दौडीमागील मुख्य उद्देश आहे. इतिहासातील परंपरेनुसार, हिंदुस्थानावर यवनांचे आक्रमण सुरू असताना आऊसाहेब जिजाऊ यांनी गर्भावस्थेत शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीकडे पुत्रप्राप्तीचे मागणे मागितले. त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या रूपाने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. पुढे महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदुस्थानात भगवा ध्वज फडकविला. या प्रेरणादायी इतिहासाची आठवण जागविण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजात रुजविण्यासाठी धारकरी या दौडीत सहभागी होतात.
पाळधी येथील श्रीराम मंदिरातून पहाटे ५.३० वाजता श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ होणार असून, गावातील विविध परिसरांतून मार्गक्रमण करत ही दौड भवानी माता मंदिरात पोहोचेल. तेथे आई भवानीची प्रार्थना करून तिच्याकडे मागणे मागण्यात येईल. या श्री दुर्गामाता दौडीत पाळधीसह परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पाळधी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

