खिर्डी
महाराष्ट्राचा इतिहास आणि वारसा प्रतिकूल परिस्थितीतही महानुभावांनी जपला व सुरक्षित ठेवला. १२ व्या शतकात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी अवतार धारण करून संपूर्ण महाराष्ट्रात पायी परिभ्रमण करुन अधिकारी जिवांना ज्ञानदान केले. मराठी आद्यग्रंथ लीळाचरित्राच्या आधारे महानुभावांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली.
श्री चक्रधर स्वामींनी मानवमात्रांच्या कल्याणासाठी अवतार धारण केला होता. स्वामींनी भक्तजनांना प्रसंगोप्राप्त शास्त्र निरुपण केले ते लीळाचरित्रात ग्रंथबद्ध केले गेले यामुळे मराठी साहित्यविश्व समृद्ध झाले असून आजही समाजाला प्रेरक असणारे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे विचार मनुष्याच्या मनाला प्रकाशित करुन दिशादर्शक ठरत आहेत.
महानुभावांचा सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक ऐतिहासिक वारसा व परंपरा समाजापर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतरण दिन महाराष्ट्र राज्यस्तरावर साजरा होण्यासाठी प्रशासकीय कार्यालयाला आदेश दिले आहेत. ही महानुभाव पंथासाठी आनंदाची बाब आहे.
म्हणूनच महानुभाव पंथीय साधक या वर्षीचा अवतरण दिन प्रशासकीय कार्यालयात साजरा करण्यासाठी परिसरातील कार्यालयात निवेदन देऊन अवतरण दिनाची माहीती देत आहेत. रावेर तालुक्यात असलेल्या माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज तांदलवाडी येथे गुरुवार दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतरण दिन साजरा करावा असे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थेचे संचालक प. पू. श्री. हरिपालदादा लासूरकर तसेच प. पू. श्री. अनेराजदादा लासूरकर प. से. सुभाष महाजन प. से. गोपाळ गंभीर महाजन व समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. सारंग पाटील यांच्या वतिने तांदलवाडीतील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री. ए. आर. चौधरी व पर्यवेक्षक एस. आर. पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले.