लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे एका पोल्ट्री शेडमधील तब्बल ३६०० बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांसह नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाखणगाव येथील पोल्ट्री व्यावसायिक संतोष पोंदे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये सुमारे ३७०० बॉयलर कोंबड्या होत्या. नेहमीप्रमाणे सायंकाळी खाद्य टाकण्यासाठी ते शेडमध्ये गेले असता, कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. या धक्कादायक घटनेत तब्बल ३६०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून केवळ सुमारे १०० कोंबड्या जिवंत राहिल्या आहेत.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागालाही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे.
कोंबड्यांच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव, खाद्यामध्ये झालेली विषबाधा, हवामानातील बदल किंवा इतर काही कारणे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तपासणी अहवाल आल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.


