लोकशाही न्यूज नेटवर्क

थायलंडमधील नॉनथाबुरी प्रांतातील एका शाळेत शुक्रवारी विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात किमान सात जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समावेश असून हल्ल्यानंतर संशयित विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडली. त्याचा नंतर मृत्यू झाला. अधिकृत यंत्रणांकडून मृत आणि जखमींच्या संख्येबाबत अद्याप अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
ही घटना बँकॉकजवळील नॉनथाबुरी प्रांतातील देबसिरीन नॉनथाबुरी शाळेत घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यार्थी शाळेच्या परिसरात आला आणि अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडली. जखमींमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समावेश असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबारानंतर शाळेच्या परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलीस, आपत्कालीन पथके आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. काही काळ शाळेच्या इमारतीत विद्यार्थी अडकून पडल्याने बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात आले.
थायलंडचे शिक्षणमंत्री प्रसर्ट यांनी जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली. हल्लेखोर हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. संबंधित शाळेत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे वृत्त आहे.


