जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिक्षणाच्या जोरावर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका 29 वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने अचानक मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना जळगावातील ऑटो नगर भागात घडली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या विष्णू उन्नीकृष्णन ओल्लेकात (वय 29) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोटच्या तरुण मुलाचा मृतदेह डोळ्यांसमोर पाहताच वडिलांना तीव्र मानसिक धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. एकाच वेळी कुटुंबावर ओढवलेल्या या दुहेरी संकटामुळे संपूर्ण परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विष्णूने हॉटेल मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण पूर्ण केले होते. तो काही महिन्यांपासून पुणे येथे नोकरी निमित्ताने स्थायिक होता. मात्र, गेल्या महिन्याभरापासून तो जळगाव येथील आपल्या घरी आला होता. दि. 27 जुलैच्या रात्री नेहमीप्रमाणे सर्वांसोबत जेवण करून तो वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. मात्र, सकाळी साडेसात वाजेपर्यंत विष्णू खोलीबाहेर न आल्याने वडिलांनी वर जाऊन पाहिले असता, विष्णूने जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले. शेजाऱ्यांच्या मदतीने विष्णूला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुण मुलाचा असा अचानक झालेला मृत्यू वडील उन्नीकृष्णन ओल्लेकात सहन करू शकले नाहीत. या प्रचंड धयाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात नोकरी करणारा विष्णू अचानक घरी का परतला आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विष्णूच्या मागे आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस या आत्महत्येमागचे कारण शोधत आहेत.


