बापरे..! किन्नर आखाड्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

चक्क ११ लाखात महामंडलेश्वरपद, एक लाखात शाही स्नान

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

हिमांगी सखी यांनी किन्नर आखाड्यातील भ्रष्टाचाराचा आणि मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांवर महामंडलेश्वर पद विक्री आणि अनाचारांचे आरोप आहेत. ११ लाख रुपयात महामंडलेश्वर खिरापतीसारखं वाटलं जात आहे, असा आरोपही हिमांगी सखी यांनी केला आहे.

अभिनेत्री ममता कुलकर्णीने किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्वीकारलं आणि सोडलं, त्यामुळे किन्नर आखाडा चर्चेत आला आहे. यावरून वाद होत असून टीकाही होत आहे. हे वाद सुरू असतानाच महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्याशी मारहाण केली, असा आरोप करतानाच हिमांगी सखीने तिच्या अंगावरील जखमाच दाखवल्या आहेत.

महामंडलेश्वर हिमांगी सखीने किन्नर आखाड्यात होत असलेल्या कामकाजावर सवाल उपस्थित केले आहेत. मी या कामकाजावर सवाल केले म्हणून मला आखाड्याच्या बाहेर काढण्यात आलं. मला मारहाण करण्यात आली. केवळ पाच हजार रुपयात आखाड्याचे ओळखपत्र दिलं जात आहे. महामंडलेश्वर पदही विकलं जातं. यासाठी ११ लाख रुपये घेतले जातात. लक्ष्मी नारायण त्रिपाठीच ही रक्कम मागते. बग्गीत बसायचं असेल आणि शाही स्नान करायचं असेल तर एक लाख रुपये मागितले जात आहेत, असा गंभीर आणि खळबळजनक दावाच हिमांगी सखी यांनी केला आहे.

किन्नर आखाड्यात पैसे घेऊन महामंडलेश्वर पद दिलं जात आहे. ममता कुलकर्णी प्रकरणातही असचं झालंय. किन्नर आखाड्यात मांस, मदिरेचं सेवन केलं जातं. लक्ष्मी नारायण त्रिपाठीच्या देखरेखीत हे सर्व होत आहे. माझ्या शिबीरात येऊन मला मारहाण केली गेली. मी चुकीच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळेच माझ्यासोबत असं झालं, असं ती म्हणाली.

मी वैष्णव धर्माची आहे. मी सुरुवातीपासूनच सनातनी आहे. आम्हाला नशा करणं, मांस आणि मदिरेचा आम्हाला शौक नाही. जे लोक मांस मदिरचं सेवन करतात, ते आमच्यात येऊ शकत नाही, असं सांगतानाच महाकुंभात किन्नर आखाड्यातील शिबीरात नशापानी केलं जातं. दारू प्यायली जाते. मांस-मदिरेची रेलचेल असते. हे सर्व आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या देखरेखीत होत आहे, असं त्या म्हणाल्या.

लक्ष्मी नारायण त्रिपाठी स्वत:ला धर्मगुरू समजतात. त्या काय संदेश देतात? 11-11 लाख रुपये गेऊन महामंडलेश्वर बनवलं जात आहे, असा आरोप करतानाच हिमांगी सखी यांना रडू कोसळलं. मी लक्ष्मी नारायण त्रिपाठींविरोधात कायदेशीर लढा देणार आहे. जे चुकीचं आहे, त्याविरोधात आवाज उठवणार आहे. किन्नर आखाडा आमच्याविरोधात गुंडगिरी करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.