जळगाव मनपा निवडणूक : भाजप -सेनेचा विजयी षटकार !
माघारीअंती महायुतीच्या १२ जागा बिनविरोध; ६३ जागांसाठी निवडणूक होणार
जळगाव (प्रतिनिधी):
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर महायुतीने दमदार आघाडी घेतली असून, आतापर्यंत महायुतीच्या १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ६ तर शिवसेनेच्या ६ जागा निश्चित झाल्याने महायुती समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आता उर्वरित ६३ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.
महायुतीच्या बिनविरोध विजयाचा श्रीगणेशा भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांनी प्रभाग क्रमांक १२ (ब) मधून केला. त्यानंतर गुरुवारी माघारीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख आणि डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
शुक्रवार, २ जानेवारी रोजी माघारीच्या दुसऱ्या व अंतिम दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या उमेदवार सरला सुनील सोनवणे यांनी अर्ज माघारी घेतल्याने शिवसेनेच्या रेखा चुडामण पाटील यांचा बिनविरोध मार्ग मोकळा झाला.
यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांक ७ (क) मधील शेवटच्या अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल सुरेश भोळे यांचा विजय निश्चित झाला. तसेच प्रभाग ७ (अ) मध्ये भाजपच्या दीपमाला मनोज काळे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री भिकन हिवराळे यांनी माघार घेतल्याने तेथेही बिनविरोध निवड स्पष्ट झाली.
दरम्यान, प्रभाग २ (अ) मध्ये शिवसेनेचे सागर श्याम सोनवणे यांच्या विरोधात छाननीअंती पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. याच दिवशी दुपारी भाजपचे डॉ. विश्वनाथ खडके (प्रभाग १६ अ), वैशाली अमित पाटील (प्रभाग १३ क), अंकिता पंकज पाटील (प्रभाग ७ ब) तसेच शिवसेनेचे गणेश उर्फ विक्रम सोनवणे (प्रभाग १९ ब) हेही बिनविरोध निश्चित झाले.
या सर्व घडामोडींमुळे जळगाव महापालिकेत महायुतीच्या बिनविरोध जागांची संख्या १२ वर पोहोचली असून, उर्वरित ६३ जागांसाठी निवडणूक लढवली जाणार आहे. महायुतीच्या या यशामुळे राजकीय वातावरण तापले असून, येत्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.