उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा : भाजप आणि शिंदेंवर खरमरीत टीका

मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क I
उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्ती आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी करत, नकार दिल्यास मराठवाड्यासह राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. “निकष खड्ड्यात घाला, शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
शिंदे-भाजपवर जोरदार प्रहार
पक्ष फुटीवर बोलताना ठाकरे म्हणाले, “काहींना पळवले, पण पितळ गेले, सोनं माझ्याकडेच आहे.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘भगवी शाल पांघरलेले गाढव’ म्हणत त्यांनी खरमरीत टीका केली. तसेच, आपल्या कार्यकाळातील कर्जमाफी आणि प्रोत्साहन योजनांना गद्दारांनी खीळ घातल्याचा आरोप केला.
संघ आणि भागवतांना खडा सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकमहोत्सवावर ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना टोला लगावला. “संघाच्या मेहनतीला लागलेली विषारी फळे तुम्हाला मान्य आहेत का? भागवत मुस्लिम धर्मगुरूंच्या भेटी घेतात, त्यांना हिंदुत्व सोडले असे म्हणण्याची भाजपची हिंमत आहे का?” असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मणिपूर, लडाख आणि जनसुरक्षा विधेयकावर टीका
मणिपूरमधील अशांतता आणि पंतप्रधान मोदींच्या दुर्लक्षावर ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. लडाखमधील सोनम वांगचूक यांच्या अटकेवर संताप व्यक्त करत, जनसुरक्षा विधेयकाविरोधात जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.
मुंबई आणि मराठी अस्मितेचा जागर
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी भाजपला ‘अमिबा’ संबोधत टीका केली. “भाजप मुंबईकडे व्यापारी नजरेने पाहतो, आम्ही तिला जीव मानतो,” असे ते म्हणाले. महिलांच्या खात्यात पैसे टाकून ‘पगारी मतदार’ तयार करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरेंसोबत युती?
राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या चर्चांवर उद्धव म्हणाले, “5 जुलैला आम्ही एकत्र आलो, मराठी माणसात फूट पडू देणार नाही.” मराठी भाषेवर हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत, “मराठीला हात लावून दाखवा, हात जागेवर ठेवणार नाही,” असे ते ठणकावले.


