अडीच वर्षानंतर मंत्रीपदावर शिवसेना आमदारांचा डोळा..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० डिसेंबर २०२४ झाली. २३ डिसेंबरला मतमोजणी झाली. एकूण २८८ जागांपैकी २३७ जागा जिंकून महायुतीला प्रचंड असे यश मिळाले. विरोधकांच्या पदरी अवघ्या ५० जागा पडल्या. एवढे प्रचंड यश महायुतीला मिळाले असताना मुख्यमंत्र्यांच्या निवडीपासून ते मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात महायुतीतील तिन्ही पक्षात वादावादी, रुसवे फुगवे झाले. त्यानंतर बारा दिवसानंतर मुख्यमंत्र्यांधी निवड होऊन त्यांचा शपथविधी झाला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले. त्यानंतर गृह खाते व महसूल खाते मिळावे म्हणून रुसून आपल्या दरेगावी जाऊन बसले. त्यानंतर शिवसेना आमदारांचा मंत्रिमंडळ समावेशावरून घोळ सुरू झाला.

अखेर अडीच वर्षानंतर दुसऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, आताचे मंत्री अडीच वर्षानंतर मंत्रीपद सोडतील, असे ठरले. मंत्री मंडळाचा विस्तार व्हायला मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर दहा दिवस लागले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपदावरून घोळ सुरू झाला. त्यासाठी महिनाभर चर्चाचर्वण सुरू राहिले. अखेर पालकमंत्रीपद घोषित झाले. परंतु नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा रुसून बसले. दरेगाव वरून फोनाफोनी झाल्यानंतर परदेशात असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली. या दोन्ही पालकमंत्रीपदाचा वाद सामंजस्याने मिटेल असे सांगितले गेले असले, तरी तो घोळ सुरूच आहे..

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे मंत्री पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पदरात पडले असले, तरी अडीच वर्षानंतर मंत्रिपद बदलल्यानंतर आपण पालकमंत्री होऊ असे जळगाव जिल्ह्यातील चार शिवसेना आमदारांना वाटतेय. विशेषतः पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांचे पहिल्याच मंत्रिमंडळात नाव जाहीर होता होता थोडक्यात हुकल्याचे सांगण्यात येते. अन्यथा मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील यांचा समावेश झाला नसता. त्यामुळे आता अडीच वर्ष शांत बसून ‘आपण अडीच वर्षानंतर मंत्री होणारच आहोत’ असे आमदार किशोर पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत सोनवणे यांना वाटते आहे. एकंदरीत एवढे प्रचंड बहुमत महायुतीला मिळून सुद्धा महायुतीचे सरकार ज्या पद्धतीने चालले आहे, ती बाब समाधानकारक नाही. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात महसूल मंत्री राहिलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद विभागून दिल्याने नाराज दिसतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना न शोभणारे विधान करून सरकारच्या प्रतिमेला धक्का देण्याचे काम ते करीत आहेत. ‘अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई न करता सोडून द्याव्यात’, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रभर गाजत आहेत. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून वादळ उठले आहे. त्यांच्या राजीनामा घ्यायला मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू आहे. २३७ आमदारांचे प्रचंड बहुमत असताना ही स्थिती का निर्माण होते? हा एक चिंतेचा प्रश्न महायुतीत निर्माण झाला आहे.

मंत्रिमंडळात समावेश होईल अशी खात्री तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून येणाऱ्या आमदार किशोर पाटलांना होती. आमदार किशोर पाटील आणि शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील प्रेमाचे संबंध पाहता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या यादीत किशोर पाटील यांचे नाव समाविष्ट असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. त्यामुळे आमदार किशोर पाटील अडीच वर्षानंतर मंत्रीपदावर क्लेम करतील आणि ते त्यावेळी त्यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यातील असलेले संबंध कसे आहेत, हे सर्वश्रुत आहे. मुख्यमंत्री शिंदे मंत्रिमंडळात चिमणराव पाटलांचा राज्यमंत्री म्हणून समावेश होता होता राहिला, असे सांगण्यात येते. परंतु त्यावेळी चिमणराव पाटलांना समजूत घालण्यात आली. कारण शिवसेनेत फूट पडली तेव्हा आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंना समर्थन देण्यात कसलीही कसूर केली नव्हती. त्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे जरी २०१९ ला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले असले तरी, त्यांनी महाविकास आघाडी सरकारात शिवसेनेचे सहयोगी सदस्य बनून सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेना फुटी नंतर चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदेंबरोबर राहिले.

आता २०२४ च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या गडाला सुरुंग लावून सुमारे २५ हजार मताधिक्याने ते विजय झाले. त्यांना मंत्रिमंडळात घ्यावे अशी मागणी होते आहे. त्यामुळे अडीच वर्षानंतर आमदार चंद्रकांत पाटील सुद्धा मंत्रीपदासाठी क्लेम करतील हे निश्चित. चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे जरी दुसऱ्यांदा आमदार झाले असले तरी २०१९ ला काही तांत्रिक कारणामुळे निवडणुकीत उभे न राहता पत्नीला उभे केले होते. व त्या निवडून आल्या होत्या. चंद्रकांत सोनवणे प्राध्यापक आहेत. त्यामुळे ते सुद्धा अडीच वर्षानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक राहतील. थोडक्यात जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.