शिंदे गटाला धक्का: २५० कर्मचाऱ्यांची उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेत ‘घरवापसी’!

0

शिंदे गटाला धक्का: २५० कर्मचाऱ्यांची उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेत ‘घरवापसी’!

मुंबई वृत्तसंस्था ;– शिवसेना पक्षाच्या फूटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या कोर्टयार्ड मेरीट हॉटेल युनिटमधील २५० सदस्यांनी कामगारांच्या तक्रारींकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आणि अन्यायाला कंटाळून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भारतीय कामगार सेनेत पुन्हा प्रवेश केला आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी या कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेचा त्याग करून शिंदे गटाच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांच्या समस्या आणि तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.

या ‘घरवापसी’ सोहळ्यासाठी भारतीय कामगार सेनेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, शैलेश परब आणि युनिट प्रमुख रुपेश कदम यांच्यासह ठाकरे गटातील अनेक नेते उपस्थित होते.

शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर नेते सामील होत असताना, त्यांच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेतील २५० कर्मचाऱ्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा आणि शिंदे गटासाठी धक्का मानला जात आहे. आगामी काळात शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील राजकीय लढत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.