शिवीगाळ केल्याच्या संशयावरून लोखंडी सळईने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

0

शिवीगाळ केल्याच्या संशयावरून लोखंडी सळईने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव – कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर शिवीगाळ केल्याच्या संशयातून शेजाऱ्यांनी एका व्यक्तीवर लोखंडी सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना १२ एप्रिल रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास समता नगर परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजेश भिमराव साळुंखे (वय ३६) हे समता नगरात वास्तव्यास असून, १२ एप्रिल रोजी दुपारी त्यांचे वडीलांसोबत घरात कौटुंबिक वाद सुरू होते. या वेळी घराबाहेर उभ्या असलेल्या राजेश यांच्याकडून शेजारी राहणारे राजेंद्र पुरुषोत्तम सैंदाणे यांना आपल्यालाच शिवीगाळ करण्यात येत असल्याचा संशय आला.

या गैरसमजुतीतून राजेंद्र सैंदाणे यांनी रागाच्या भरात लोखंडी सळईने राजेश यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यावेळी राजेंद्र यांचा मुलगा जय सैंदाणेही घटनास्थळी आला. त्यानेही शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. हल्ल्यानंतर दोघेही आपल्या घरी निघून गेले.

जखमी राजेश साळुंखे यांनी उपचार घेतल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार राजेंद्र सैंदाणे आणि जय सैंदाणे यांच्याविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.