नंदकुमार शेलकर
पाचोरा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजल्याने राजकीय आखाड्यात मोठी रंगत वाढली आहे. राजकीय चित्र स्पष्ट झाल्याने आजी, माजी, भावी इच्छुक उमेदवार आपापल्या स्तरांवर नेत्यांकडे शिफारसी करून उमेदवाऱ्या मिळविल्या आहे. निवडणूक आखाड्यात नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला दिवसेंदिवस वेग आला असून शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन प्रचाराचे नारळ वाढविले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि प्रभागांच्या प्रचाराचा श्रीगणेशा करून कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. पाचोऱ्यात शिवसेना शिंदे गट व भाजपा आमने सामने आले असून येथे युतीला फाटा देण्यात आला आहे. अनेक प्रभागात काटे की टक्कर होत असून स्थानिक पातळीवर आरोप प्रत्यारोप वाढले आहेत.
आजच्या स्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी मागणारे मोठ्या प्रमाणात होते. महाविकास आघाडी या दोघांकडून नाराज झालेले आपल्या पदरात पाडून घेण्याच्या भूमिकेत असल्याच्या चर्चा होत्या. आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार अशी चर्चा पण होती. विरोधकांच्या फक्त बाता ठरल्या. राज्याच्या सत्तेतील शिंदे गटाच्या शिवसेनेने विकासाचा तर भाजपाने परिवर्तनाचा मुद्दा घेऊन प्रचार सुरू केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (आय) यांच्या महाविकास आघाडीचा कोणताच ताळमेळ दिसून आला नाही. हे पक्ष राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी सोशल मीडियावर वाऱ्यावर लाता आणि फक्त बाता करताना चर्चेत आहेत. मनसे, एमआयएम हे पक्ष देखील आखाड्यात उतरणार अशी चर्चा होती. काँग्रेसने ऐकला चलो रे ची भुमिका घेत काही प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहे. तब्बल 9 वर्षांनंतर या निवडणुका होत असल्याने निवडणूक लढविण्यासाठी शहरात अनेक जण एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. प्रमुख जनाधार असलेल्या व मते खेचण्याची धमक असलेल्या मध्येच खरी लढत होणार आहे. मात्र जनाधार असलेल्या विरोधात काही इच्छुक, हौशी यांना मनासारखी उमेदवारी नाकारली गेल्यास बंडोबा बंड करू शकतात हे नाकारता येत नाही. त्यामुळे प्रभागांमध्ये काही प्रमाणात मतांचे विभाजन करून काहींचे विजयाचे गणित बिघडू शकते हे मात्र नाकारून चालणार नाही.
पाचोरा नगरपालिकेत यंदा शिवसेना शिंदे गट व भाजपा असाच सामना होणार असून काँग्रेस व उबाठा सेनेचे काही प्रभागात उमेदवार उभे आहेत. यातही नगराध्यक्षपदाचे समिकरण आता पुरते बदलून गेले आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आ. किशोर पाटील यांच्या पत्नी सुनिता पाटील व भाजपातर्फे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांच्यात काटे की टक्कर आहे. नगरसेवक पदासाठी 14 प्रभागांमधून 28 नगरसेवक निवडून द्यायचे आहे. नगरपालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. एक नगराध्यक्ष व 28 नगरसेवक जागांसाठी ही निवडणूक होणार असून प्रत्येक प्रभागात दोन सदस्यांची निवड होणार आहे. त्यामुळे पाचोरा नगरपालिका निवडणूक यंदा बहुरंगी आणि चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

