शिरपूरात २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या !

0

शिरपूर लोकशाही न्यूज नेटवर्क

ऐतिहासिक परंपरा लाभलेली खंडेराव महाराजांची यात्रा उत्सव सुरू होत असतांना शिरपूर शहरात क्रांतीनगरमध्ये यात्रेच्या पूर्वसंध्येलाच तरुणाची धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आल्याने शिरपूर शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संशयिताला धुळे एलसीबी व शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाने धुळे येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राहुल राजू भोई वय 22 असे मयत तरुणाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शिरपूर शहरातील शिंगावे शिवारातील बालाजी नगर भागात राहणारा राहुल राजू भोई वय 22 या तरुणावर दि.‌ 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शहरातील क्रांती नगरातील भद्रा चौकात हल्ला करण्यात आला. त्याच्या पोटात चाकूने सपासप वार करण्यात आले. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. यामुळे रुग्णालयात त्याचा नातेवाईकासह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राहूल हा घरातील एकुलता एक मुलगा होता. कुटुंबियांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

5 फेब्रुवारी रोजी सकाळी हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात संशयितांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. शिरपूर पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या मांडून जोपर्यंत सर्व आरोपिंना ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे संगण्यात आले. यावर पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासना दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसह फॉरेन्सीक पथकाने घटनास्थळी भेट देवून काही नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. शिवाय, खूनासाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी काल शिरपूर शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात संशयावरुन भटू पाटील यास ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.