जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चोपडा विधानसभा मतदारसंघात चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील की नगांव, साकळी ह्या महसूल मंडळांचा समावेश आहे. चोपडा हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे. हा मतदारसंघ राखीव होण्याआधी येथे शिवसेनेचे कैलास पाटील आमदार होते. त्यांच्या अगोदर अरुणभार्इ गुजराथी यांचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. अरुणभार्इ गुजराथी हे तब्बल 35 वर्षे आमदार, विविध खात्यांचे मंत्री व विधानसभेचे अध्यक्षही होते.
अरुणभार्इंच्या विरोधात कैलास पाटील यांनी दोन वेळा आपटी खाल्ली असली तरी तिसऱ्या टर्मला त्यांनी अरुणभार्इंना मात दिली. गेल्या दोन टर्मपासून या मतदारसंघात सुरुवातीला प्रा. चंद्रकांत सोनवणे व सन 2014 मध्ये लतातार्इ सोनवणे यांचा विजय झाला. सन 2014 मध्ये काही कारणास्तव चंद्रकांत सोनवणे यांना निवडणूक लढणे कायदेशीर शक्य नसल्याने त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली. आता 2024 मध्ये लतातार्इ सोनवणे यांनाही कायदेशीर अडचण येण्याची शक्यता असल्याची चर्चा असल्याने पुन्हा प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
आघाडीत राष्ट्रवादी (शप) गटाकडे हा मतदारसंघ असून त्यांच्याकडे यावेळी उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे. स्थानिक इच्छुक असतांनाही राष्ट्रवादी यावेळी धुळे जि. पच्या सदस्या ज्योती पावरा यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. तर डॉ. चंद्रकांत बारेला, डी. पी. साळुंखे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक असून ते ऐनवेळी अपक्ष लढण्याची शक्यता आहे.