लोकशाही न्यूज नेटवर्क

पेपर फुटी प्रकरणावर आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १७ दिवसांपासून उपोषणावर असून त्यांची प्रकृती खालावत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. हा अत्यंत गंभीर विषय असून सरकारने तातडीने दखल घ्यावी, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत भाजपवर जोरदार टीका केली.
डी-लिमीटेशन विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) समर्थन देणार असल्याच्या चर्चांना राऊत यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले. ही माहिती पूर्णपणे चुकीची असून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती देत, आमची त्यांच्याशी चर्चा झाली असून त्या सविस्तर भूमिका मांडतील, असे राऊत म्हणाले. मंगळवारी रात्री झालेल्या जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीवर ते म्हणाले, जयंत पाटील हे महत्त्वाचे नेते असून त्यांच्या मतदारसंघातील नगराध्यक्षाला बेकायदेशीररित्या अपात्र ठरविण्यात आले, हा लोकशाहीसाठी धोकादायक प्रकार आहे.
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची फुटीर खासदारासमवेत भेट घेतल्याने राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. या देशात कायदा आहे की नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्याला हटकत नाही. गृहमंत्र्यांकडे चोरीचा माल घेऊन जातात ही गंभीर गोष्ट असल्याचे राऊत म्हणाले.


