मंत्रिपदासाठी 40 जण गोळा अन् विधान परिषद आमदारांचाही डोळा !
शिंदेंचे तीन निकष ठरले : समतोल साधण्यावर देणार भर
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शनिवार दि. 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी शिंदे मंत्रिपद भूषवलेल्या तीन ते चार आमदारांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांची निवड करू शकतात.
शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाची निवड ही तीन निकषांचा विचार करुन केली जाईल. प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचा समतोल साधतानाच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मंत्र्यांची निवड केलेली असेल. काही मंत्रिपदे फिरती ठेवली जाऊ शकतात. म्हणजे साधारण दोन वर्षांनंतर मंत्र्यांमध्ये फेरबदल करुन इतरांना मंत्री बनण्याची संधी दिली जाऊ शकेल. परंतु गृह खाते मिळवण्याची शिवसेनेची धडपड असली, तरी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावर त्यांना समाधान मानावे लागेल.
विधानपरिषद आमदारांचाही डोळा
भाजप नेते गिरीश महाजन हे शिंदेंच्या सेनेच्या प्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भावना गवळींसारख्या काही विधानपरिषद आमदारांचाही मंत्रिपदावर डोळा असल्याची चर्चा आहे. संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यासारख्या माजी मंत्र्यांना वगळले जाऊ शकते. मंत्रिपदासाठी 40 हून अधिक इच्छुक असल्याने शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सर्वांना सामावून घेताना दमछाक
2022 मध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा सेनेकडे 40 आमदार होते. आता ही संख्या 57 वर गेली असून चार अपक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. सर्वांना सामावून घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे. ज्या आमदारांना मंत्री केले जाणार नाही, त्यांना सरकारी महामंडळांवर सहभा करुन घ्यावे लागेल. भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांच्यासारखे नेते 2022 पासून मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहेत, असे राजकीय जाणकार सांगतात.