शास्त्रीयदृष्ट्या शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची – डॉ. के. ई. लवांडे

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीचे तंत्र समजून घेऊन शास्त्रीयदृष्ट्या शेती कसण्याचा ध्यास घेतला पाहिजे. यासाठी योग्य वाण, बियाणांची निवड केली पाहिजे. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या लागवड पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. ठिबक सिंचनाचा काटेकोर व्यवस्थापनातून शास्त्रीयदृष्ट्या शेती केली तर ती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरेल, असा विश्वास दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आयएसएचे अध्यक्ष डॉ. के. ई. लवांडे यांनी व्यक्त केला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व इंडियन सोसायटी ऑफ एलियम्स (आयएसए, राजगुरूनगर, पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र यांच्यातर्फे जैन हिल्स येथे तिसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रत्यक्ष शिवार भेटीमध्ये डॉ. के. ई. लवांडे बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत तेलंगणा कृषी विद्यापीठाचे कुलुगरू डॉ. निरजा प्रभाकर, तेलंगणा कृषी विद्यापीठाचे संशोधन विभागाचे संचालक डॉ. ए. भगवान, जैन फार्मफ्रेश फूड्स लि.चे संचालक सुवन शर्मा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण यादव, के. बी. पाटील, शेतकरी प्रतिनिधी म्हणून डॉ. दत्तात्रय सहदेवने यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते. दरम्यान प्रत्यक्ष संशोधन विकास परिक्षेत्राचा अभ्यासासाठी देशभरातून सहभागी कांदा व लसूण चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व संशोधकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी उपसंचालक (फलोत्पादन) डॉ. एच. पी. सिंह, एडीजी भारत सरकार डॉ. सुधाकर पांडे, एडीजी डॉ. मेजर सिंग यांनीसुद्धा संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावरील जैन हायटेक तंत्रज्ञानातून समृद्ध शेती, फळबागांमधील अतिसघन लागवड तंत्रज्ञानासह कांद्याच्या ८२ प्रकारच्या विविध जातींची लागवड बघितली. एनर्जी पार्क, टिश्यूकल्चर पार्क, जैन स्वीट ऑरेज, फ्युचर फार्मिक, भविष्यातील शेतीमध्ये एरोपोनिक, हायट्रोपोनिक, व्हर्टिकल फार्मिंग हे मॉडर्न अॅग्रीकल्चर कांदा व लसूण राष्ट्रीय चर्चासत्रातील सहभागी संशोधकांनी अभ्यासली.

प्रत्यक्ष शिवार भेटीप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. के. ई. लवांडे यांनी कांदा व लसूण चर्चासत्रांच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. त्यात ते म्हणाले, शेतकरी, विद्यार्थी, संशोधक, भागधारक, बिजोउत्पादक यांना एकत्रीतपणे आणून कांदा व लसूण पिकांमधील जगभरातील चांगले संशोधन समजावे यातून गुणवत्तापुर्ण कांद्याचे उत्पादन व्हावे हा उद्देश असल्याचे सांगितले. आणि तो जैन हिल्सच्या संशोधन प्रात्याक्षिक केंद्रावर लावलेल्या विविध प्रकारच्या कांदा पिकातून दिसतो. ८० ते ८२ दिवसाचे पिकपद्धती बेड पद्धत, ठिबक, रेनपोर्ट, स्प्रिंकलर, जैन ऑटोमेशन आणि न्युट्रीकेअर मधून अचूक आणि मोजूनमापून दिलेले खतांमुळे येथील कांद्याचे उत्पादन प्रति एकरी १८ ते २० टन येऊ शकते. याठिकाणी अभ्यास दौरानिमित्त शेतकऱ्यांनी यावे ते पहावं आणि या पद्धतीने शेती करावी दरामध्ये चढ उतार जरी झाले तरी उत्पादन वाढीमुळे त्याचा फायदा होईल असा विश्वास डॉ. के. ई. लवांडे यांनी व्यक्त केला.

डॉ. निरजा प्रभाकर यांनी मनोगत व्यक्त केले त्यात त्या म्हणाल्या, कांदा लागवडीसाठी व काढणीसाठी मजूरांचा खर्च वाढतो यावर उपाय म्हणून जैन हिल्सच्या संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर कांदा काढणी यंत्र, लावणी यंत्रासह विविध शेतीउपयुक्त अशी अवजारं आहेत. यासह जैन ऑटोमेशन यंत्रणेमुळे सिंचनासाठी लागणारा अतिरीक्त खर्च कमी होईल आणि विविध वाणांतून समृद्धीचा मार्ग शेतकऱ्यांना मिळेल असेही त्या म्हणाल्या.

डॉ. ए. भगवान यांनी जैन हिल्स संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर लावलेल्या फळबागेसह, कांदा लागवडीसाठी एकात्मिक स्वयंचलित यंत्रणेतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जवळपास ३० ते ४० टक्के जास्त होईल कारण वॉटर सोल्युबल खतांचा पुर्णक्षमेतेने वापर हा फर्टिगेशन यंत्रणेमुळे शक्य असल्याचे डॉ. ए. भगवान यांनी सांगितले.

शेतकरी प्रतिनिधी म्हणून अहनगरचे डॉ. दत्तात्रय सहदेवने यांनी शेतकऱ्यांच्या वतीने शिवार फेरी मिळालेल्या तंत्रज्ञानातून एकाच ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या जातींच्या कांद्याचे पीक घेता येऊ शकते असा विश्वास निर्माण झाल्याचे सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.