शेंदुर्णी ता. जामनेर

नगरी प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीमध्ये त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनासाठी रात्रीपासून भक्तांनी अलोट गर्दी केली. रात्री बारा वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे, पंडितराव धांडे, उषा धांडे, अक्षय धांडे, पूजा धांडे, नगराध्यक्ष, गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष शरद बारी, स्नेहदीप गरुड, पत्रकार युवराज सूर्यवंशी, सारिका सूर्यवंशी, व्यापारी पवन अग्रवाल, डॉ. हर्षल बोरोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, नंदिनी दातरे, पो.उ.नि. नंदकुमार शिंब्रे, प्रगती शिंब्रे, अक्षय अंबाडकर, राजश्री अंबाडकर (बडनेरा), कु. राजलक्ष्मी गरुड, चौधरी यांच्या हस्ते त्रिविक्रम महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. मंदिराचे मुख्य पुजारी शिरीष देवकर, भूषण देवकर तसेच ॲड. देवेंद्र पारळकर, अरुण जोशी, जयवंत पिसे, विजय पाठक, ज्ञानेश जोशी, राहुल जोशी, तुषार पिसे या ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात अभिषेक पूजा संपन्न झाली.
रात्री २ वाजता भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. वरुणराजाची शेतकऱ्यांवर चांगली कृपा असल्यामुळे लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सोयगाव रोडवरील पाण्याची टाकी व मेणगाव रोडपर्यंत महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. शेंदुर्णी परिसरातील खेड्यापाड्यांतील दिंड्या मोठ्या संख्येने शेंदुर्णीत दाखल झाल्या. यावेळी शहरातील विविध भक्त मंडळे, पतसंस्था, व्यापारी, विविध संस्था, मंडळे व वैयक्तिक दात्यांच्या वतीने जागोजागी भाविकांना फराळ, केळी, दूध, चहाचे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मोफत चप्पल सुविधा व पार्किंगची सुविधा पुरविण्यात आली. आरोग्यवर्धिनी केंद्र, शेंदुर्णी तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सेवा भारती देवगिरी प्रांत, रेड स्वस्तिक संस्था, महालक्ष्मी हॉस्पिटल यांनी आरोग्य सुविधा पुरविली. मंदिराची सजावट शिरपूर येथील प्रसिद्ध सजावटकार विजय फुलारी यांनी केली होती.
आषाढी एकादशीला जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, जामनेर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, दीपक तायडे, जळगावचे नगरसेवक अरविंद देशमुख, नगरसेविका सुचिता हाडा आदींनी दर्शन घेतले. शेंदुर्णी व पंचक्रोशीतील असंख्य पायी दिंड्या भजनात तल्लीन होत दर्शनासाठी आल्या होत्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक, पहूर प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक, शेंदुर्णी नंदकुमार शिंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल, भुसावळ, जामनेर, पारोळा, फत्तेपूर येथील पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा व त्यांच्या सर्व पोलीस सहकारी बांधवांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. सकाळी व दुपारी दर्शनाची रांग पाण्याची टाकी व मेणगाव रस्त्यापर्यंत पोहोचली होती. रात्री उशिरापर्यंत दर्शनाच्या रांगा सुरू होत्या. परंपरेनुसार यंदाही वरुणराजाने आपली हजेरी लावली होती. भगवान श्री त्रिविक्रम महाराज की जयच्या जयघोषाने शेंदुर्णी नगरी दुमदुमली होती. नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती.


