शेंदुर्णी शहरात दुर्गा विसर्जन उत्साहात
शेंदुर्णी, लोकशाही न्युज नेटवर्क
मंगळवारी शेंदुर्णी शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कोल्हापुरच्या अंबाबाईच्या वेषात असलेल्या सौ. स्वप्ना पवन सुर्यवंशी या महिलेचे विशेष कौतुक होत आहे. कारण तब्बल ७ तास एकाच जागी असलेल्या या महिलेने अंबाबाईचा देखावा अक्षरशः जीवंत केला. दरम्यान महिलांची पारंपारिक वेशभुषा, टाळ मृदंगाच्या जयघोषातील नृत्य, लेझीम पथक, समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा आभारपत्र देऊन सत्कार अशा विविध उपक्रमांचे मानकरी ठरले ते म्हणेज लोकप्रिय दुर्गोत्सव मंडळ.
दुपारी ४ वाजता सार्वजनिक मिरवणुकीस प्रारंभ झाला. यंदाच्या वर्षी प्रचंड उत्साह संपुर्ण नवरात्रोत्सवात होता. विसर्जन मिरवणुकीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिला, युवती यांचा सहभाग होता. शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडळाच्या महिला लेझीम, झांज पथक, सोबत भजनाच्या तालावर नृत्य करणाऱ्या, चौकाचौकात गरबा खेळत दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीत उत्साह वाढवत होत्या. सगळ्याच दुर्गोत्सव मंडळांनी वेगवेगळ्या प्रकारचे सजीव दृश्ये व पारंपरिक वेशभूषा यामुळे परंपरा अजुन कायम असल्याचे सर्वच मिरवणुकीत प्रकर्षाने जाणवत होते.
रथाच्या घराजवळ अग्रवाल परिवाराचे वतीने खिचडीचे वाटप, भावसार बंधुंच्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जागोजागी मिरवणुकीत सहभागी देवींचे दर्शन घेऊन औक्षण केले जात होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मिरवणुक शांततेत पार पडावी यासाठी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहुरचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोउनि. भरत दाते शेंदुर्णी दुर क्षेत्राचे पोउनि. नंदकुमार शिंब्रे यांनी आपल्या पोलिस कर्मचारी होमगार्ड यांच्या सह चोख बंदोबस्त ठेवला होता.