शेअर बाजारात हाहाकार, पाच मिनिटांत ३.८ लाख कोटींचा फटका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेअर बाजारात सध्या मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळच्या सत्रात तब्बल सुमारे १ हजार अंकांनी कोसळला. तर निफ्टीची ३०० अंकांनी घसरण झाली. यामुळे बाजार सुरु होताच पहिल्या पाच मिनिटांत गुंतवणूकदारांना ३.८ लाख कोटींचा फटका बसला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर लवकरच वाढवण्याचे मिळालेले संकेत आणि परदेशी निधीचा ओघ यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण झाली असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गेल्या सात सत्रांत सेन्सेक्सची झालेली घसरण ही एकूण ४,५०० अंकांची आहे. यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल २१ लाख कोटींचा फटका बसला आहे. १७ जानेवारी रोजी सेन्सेक्स ६१,३०८ अंकांवर होता. त्यानंतर २५ जानेवारीचा दिवस वगळता आतापर्यंतच्या सात सत्रांत सेन्सेक्स एकूण ४,४६८ अंकांनी घसरलाय. यामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजारी भांडवल १७ जानेवारीच्या २८०.०२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत आज २५८.७४ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.

सेन्सेक्स आज गुरुवारी सकाळच्या सत्रात १,०१७ अंकांनी घसरला. त्यानंतर ही घसरण ११०० अंकांपर्यंत गेली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने मार्चमध्ये व्याजदर वाढवण्याची शक्यता असल्याचे सांगितले. याचा परिणाम आशियातील बाजारांत दिसून आला. यामुळे सेन्सेक्स ५७ हजारांच्या खाली तर निफ्टी १७ हजारांच्या खाली येऊन व्यवहार करत आहे.

जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेअर बाजाराला मोठे धक्के बसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो-कोटींचे नुकसान झाले आहे. देशाचा अर्थसंकल्प तोंडावर आला असताना शेअर बाजाराची झालेली ही घसरण निराशाजनक असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.